मुक्तपीठ टीम
अंधेरी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या लढण्याच्या मार्गातील अडथळे मुंबई उच्च न्यायालयाने दूर केले आहेत. मुंबई मनपाला शुक्रवारी अकरा वाजेपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेकडून मशाल चिन्हावर त्या लढणार हे नक्की झालं आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात आता भाजपा लढणार की शिंदेंच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना, याबद्दल उत्सुकता आहे.
खरंतर २०१९च्या निवडणुकीत भाजपा शिवसेना युती असतानाही शिवसेनेच्या रमेश लटकेंविरोधात काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी भाजपात आलेल्या मुरजी पटेलांनी बंडखोरी केली होती. दिवंगत नगरसेवक सुनिल यादव यांच्यासारख्या निष्ठावान भाजपा नेत्यांव्यतिरिक्त इतर काहींच्या छुप्या पाठिंब्याने लढत त्यांनी ४५ हजार मते मिळवली होती. पण रमेश लटके यांनी तरीही ६७ हजार मते मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. आता तेच मुरजी पटेल त्यांनाच भाजपाची उमेदवार असल्याची चर्चा कालपर्यंत सुरु होती. पण ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंशी चर्चा करून ते कोण लढणार, याचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता अंधेरीत कोण लढणार, हा मुद्दा चर्चेत आला आहे.
त्यांच्या पतीच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवार आहेत. मात्र, त्या लिपिक म्हणून सेवा करत असलेल्या मुंबई मनपाकडून त्यांचा राजीनामा मंजूर केला जात नव्हता. त्यात आजवर निष्कलंक सेवा बजावलेल्या ऋतुजा रमेश लटकेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आल्याचं मुंबई मनपानं न्यायालयात सांगितलं. पण शिवसेनेच्या वकिलांनी ती तक्रार ३ ऑक्टोबरला राजीनामा दिल्यानंतर बुधवारी १२ ऑक्टोबरला ती तक्रार आल्याचं उघड केलं. अखेर न्यायालयानं मुंबई मनपाला शुक्रवारी १४ ऑक्टोबरला म्हणजेच निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११पूर्वी ऋतुजा रमेश लटकेंचा राजीनामा स्वीकारल्याचं पत्र देण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने येत्या ३ नोव्हेंबरला तिथे पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र ऋतुजा लटके या महापालिका कर्मचारी असून त्यांचा राजीनामा पालिकेने मंजूर केलेला नाही. याकारणाने लटके उमेदवारी अर्ज भरू शकत नसल्याने तिढा निर्माण झाला होता. आता मात्र त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून पालिकेने लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. अखरे त्यांना यश मिळाले. दरम्यान ऋतुजा लटके यांना शिंदे गटात खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याच्याही बातम्याही आल्या. एकंदरीतच ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आधी पक्षाचं नाव, चिन्ह यासाठी अडथळ्यांना तोंड द्यावं लागल्यानंतर उमेदवाराच्याबाबतीत नवे अडथळे निर्माण केले गेल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. अखेर आज न्यायालयाने ऋतुजा रमेश लटके यांना दिलासा दिला.