मुक्तपीठ टीम
एखाद्या विवाहित महिलेला घरातील कामे करण्यास सांगितल्यास ती क्रूरता ठरणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोंदवले. तसेच पत्नीची तुलना मोलकरणीच्या कामाशीही होऊ शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि क्रूरतेसाठी एका महिलेने तिचा पती आणि तिच्या सासच्या मंडळींविरुद्ध दाखल केलेला खटला फेटाळताना उच्च न्यायालयाने हे सांगितले.
महिलेने काय आरोप केले?
- महिलेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, लग्नानंतर महिनाभर तिच्याशी चांगले वागले, मात्र त्यानंतर ते तिच्याशी मोलकरणीसारखे वागू लागले.
- लग्नानंतर महिन्याभरात चारचाकी खरेदी करण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींनी चार लाख रुपयांची मागणी सुरू केल्याचा दावाही तिने केला.
- या मागणीवरून पतीने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
पती आणि सासू विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश…
- जर एखाद्या विवाहित महिलेला कुटुंबासाठी घरातील काम करायला सांगितले जात असेल तर, त्याचा अर्थ तिच्याकडून मोलकरणीसारखं कामं करून घेतले जात आहे असा होत नाही.
- जर स्त्रीला घरातील कामे करायची इच्छा नसेल तर, त्यांनी लग्नापूर्वी तसे सांगायला हवे होते जेणेकरुन वराला लग्नापूर्वी पुनर्विचार करणे सोपे होईल.
- लग्नानंतर ही समस्या उद्भवल्यास लवकरात लवकर यावर उपाय योजना करणे आवश्यक होते असे मतही न्यायालयाने नोंदवले आहे.
- तसेच न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने महिलेचा पती आणि सासू विरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचेही आदेश दिले आहेत.
तक्रारीत कोणत्याही विशिष्ट छळाचा उल्लेख नाही…
- उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महिलेने केवळ तिचा छळ झाल्याचे सांगितले होते, परंतु तिने तक्रारीत कोणत्याही विशिष्ट छळाचा उल्लेख केलेला नाही.
- भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८अ साठी केवळ मानसिक आणि शारीरिक अपमानास्पद शब्दांचा वापर पुरेसा नाही जोपर्यंत अशा कृतींचे वर्णन त्यामध्ये केले जात नाही.