मुक्तपीठ टीम
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे आरे दुग्ध वसाहत येथील प्रक्षेत्रातील जनावरांमध्ये लम्पी त्वचारोग या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्र या संसर्ग केंद्रापासून (Epicentre) १० किलोमीटर पर्यंत बाधित क्षेत्र (Infected zone) म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर केले आहे.
श्रीमती चौधरी म्हणाल्या, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे आरे दुग्ध वसाहत येथील प्रक्षेत्रातील जनावरांमध्ये लम्पी त्वचा रोग आजाराचे जनावरे आढळून आले आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, मुंबई उपनगर जिल्हा प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार प्राप्त अधिकारातून आरे दुग्ध वसाहत येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्र या संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटर पर्यंत बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
लम्पी रोगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करुन १० किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतुक, बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. वरील ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स (Goat Pox) लसीकरण तत्काळ करण्यात यावे. याकरिता उपआयुक्त पशुसंवर्धन (गुणनियंत्रण), यांनी आरे दुग्ध वसाहत येथे, व बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पशुवैद्यकीय विभाग यांनी आरे दुग्ध वसाहत वगळून मुंबई उपनगर जिल्हा येथे नियोजन करून १०० टक्के लसीकरण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.