प्रा मुकुंद आंधळकर
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात याव्यात असा निर्णय माननीय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षा गायकवाड यांना कळवला होता व त्यामध्ये कोणताही बदल सुचवलेला नाही. बारावीच्या ऑनलाइन परीक्षा घेणे ग्रामीण भागात अशक्य असून त्या सुरळीतपणे पार पडणार नाहीत. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे असे महासंघाचे समन्वयक प्रा मुकुंद आंधळकर यांनी कळवले आहे. महाराष्ट्रात काहीजण ऑनलाइन परीक्षा घेण्यास सुचवत असले तरी ते तांत्रिक सुविधेअभावी शक्य होणार नाही. या वर्षी मंडळामार्फत बारावीची परीक्षा घेणे आवश्यक असून ऑफलाइन परीक्षेला इतर कोणत्याही पर्याय आता उपलब्ध नसल्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या तीव्रतेमुळे गेल्या वर्षी २०२१ मध्ये इयत्ता बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेता येणे शक्य झाले नव्हते तथापि या विद्यार्थ्यांनी मंडळाची शालांत परीक्षा दिलेली असल्यामुळे या गुणांच्या आधारे काहीसा न्याय बारावीच्या परीक्षांबाबत गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना देता आला होता परंतु आता यावर्षी हे शक्य होणार नाही तसेच आता कोरोनाचा प्रभाव पुरेसा कमी झाला असून जनजीवन जवळपास सुरळीत झाले आहे अशावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून दूर ठेवणे उचित ठरणारे नाही. तांत्रिक सुविधा नसलेल्या ग्रामीण भागात जुलैपासूनच ऑफलाइन वर्ग सुरू झाले असल्यामुळे तसेच तांत्रिक सुविधा असलेल्या शहरी भागात आधी ऑनलाईन व नंतर ऑक्टोबरमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पुरेसा झाला आहे तसेच प्रात्यक्षिकेही पुरेशा प्रमाणात झालेली आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही कमी करण्यात आलेला असून परीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे. प्रश्नपत्रिका तयार आहेत, वेळापत्रक जाहीर झाले आहे, परीक्षा केंद्र निश्चितीकरण अंतिम टप्प्यात आहे. प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षांची तयारी झाली आहे. अशावेळी फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेसाठी मानसिक दृष्ट्या व अभ्यासाच्या दृष्टीने तयार आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी काहीशा संभ्रमावस्थेत का होईना पण परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. दहावी-बारावीच्या मंडळाच्या परीक्षा ऑफलाइन होणे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने सुध्दा हितकारक आहे.
प्रा मुकुंद आंधळकर
(समन्वयक, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ)