छत्रपती शिवाजी महाराज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरी घेतलेली स्वराज्याची शपथ.
विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेलं संविधान.
दोन महापुरुषांनी भारताला दिलेले महामंत्र. स्वराज्य आणि संविधान. दोन्ही महामंत्रांचा उद्देश, सोप्या भाषेत सांगायचा तर एकच…माणसांना माणसांसारखं सन्मानान जगण्याची हमी!
शिवरायांच्या आधी महाराष्ट्रात माणूस म्हणून जगता येणं अवघड होतं. सरदार तर अन्याय करणाऱ्या बादशाहीचे बटिक होऊन आपलं शौर्य गहाण टाकून होते. शहाजीराजेंसारखे अपवाद होते. पण ते अपवादच. आपल्याच मातीत, आपल्याच माणसांना माणूस म्हणून जगणं अशक्य झालं होतं, हेच सर्वार्थानं सत्य होतं. जिजाऊ आईसाहेबांच्या शिकवणुकीमुळे शिवरायांचं जीवन घडलं ते रयतेची काळजी घेणारा आपला राजा म्हणूनच. त्यातूनच मग कोवळ्या वयातच शिवरायांनी सवंगड्यांना एका समान विचारानं आपलंसं केलं. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेतली. लक्षात घेतलं पाहिजे,ती शपथ महत्वांकाक्षेतून निर्माण करायच्या साम्राज्याची नव्हती, तर प्रत्येकाला आपलं वाटणाऱ्या आपल्या स्वराज्याची होती. असं स्वराज्य,जे प्रत्येकाचं आपलं राज्य असेल. असं स्वराज्य जिथं प्रत्येकाला कसलाही भेदभाव न करता माणूस म्हणून सन्मानानं जगता येईल.
बाबासाहेबांनीही ३०५ वर्षांनी तसंच केलं. भारतात राजेशाहीची,संस्थानिकांची बजबजपुरी होती. नुकत्याच इंग्रजी साम्राज्यशाहीतून मोकळ्या झालेल्या भारताला त्यांनी संविधान दिलं. संविधानानं लोकशाही आणली. अशी लोकशाही जिथं कोणताही भेदभाव नाही. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य. लोकांना प्रत्येकाला आपलं, स्वत:चं वाटेल असं राज्य…म्हणजेच स्वराज्य. जिथं माणूस म्हणून सन्मानानं जगण्याची हमी नव्हती, जी हमी केवळ देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं म्हणून मिळू शकली नसती, ती समानतेची हमी बाबासाहेबांच्या संविधानानं दिली. बाबासाहेबांचं संविधान मांडतं ती तत्व…स्वातंत्र्य, समता, बंधूता…त्यातून मिळते ती माणसांना माणसांसारखं सन्मानानं जगण्याची हमी.
हे सारं मनी आलं. आता मांडतोय त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी इमान राखणारी पत्रकारिताच केली पाहिजे. यासाठीच मराठीतील स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयत्नाची सुरुवात करत आहे. मुक्तपीठची प्रेरणा स्वराज्य आणि संविधान यांच्यातच या महामंत्रांमध्येच.
मुक्तपीठ हे आपलं सर्वांचं आहे…सर्वांचं हक्काचं…मुक्तपीठ.
अन्यायाविरोधात सर्वांचाच आवाज ठरणारं मुक्तपीठ.
मुक्तपीठ हे समानतेची हमी देणारं मुक्तमाध्यम असणार आहे.
समानतेचं मुक्तमाध्यम.
कसलाही भेदाभेद न करता सर्वांना आपले विचार मांडण्याची संधी देणारं मुक्तपीठ.
त्यामुळेच मुक्तपीठ टीम आज www.muktpeeth.com वेबसाइटचा शुभारंभ आज स्वराज्य आणि संविधानाला साक्षी ठेऊन करत आहे. स्वराज्य आणि संविधान. आपोआपच एक सांगड घातली गेली. अगदी नैसर्गिक अशी.
मुक्तपीठ आपलं सर्वांचं आहे. मी तुळशीदास भोईटे असणार आहे तो सुत्रधाराच्या भूमिकेत. मुक्तपीठ मुक्तमाध्यम उपक्रमातून खूप उत्पन्न होईल अशा स्वप्नाळू वृत्तीत मी रमत नाही. त्यासाठीच माध्यम सेवा, इतर काही मुख्य माध्यमांसाठी पत्रकारिता वगैरे उपक्रमातून उत्पन्न मिळवून त्यातून मुक्तपीठचा खर्च भागवण्याचे नियोजन आहे.
मुक्तपीठ हे एक सर्वार्थानं मुक्तमाध्यम व्हावं हाच उद्देश आहे. कोणतंही राजकीय, आर्थिक जोखड नसलेलं मुक्त माध्यम. मला वाटतं, आवडतं, पटतं ते मी लिहिणारच, व्हिडीओतून मांडणारच. पण मला जे वाटत नाही, आवडत नाही, पटत नाही तेही जर कुणाला मांडायचं असेल तर ती मोकळीक मुक्तपीठवर असणारच असणार. स्वातंत्र्य म्हणायचं आणि मग ते संपादक किंवा फार तर सोबतच्या पत्रकारांपुरतंच मर्यादित ठेवायचं असं नसणार. विचार कोणतेही असो ते मांडावेतच. हक्कानं मांडावेत. कसलीही पर्वा करायची नाही. फक्त देशाच्या विरोधात नसावेत, संविधानानं दिलेल्या हमीचा भंग करणारे नसावेत, कोणाचाही गलिच्छ बदनामी करणारे नसावेत, एवढीच अपेक्षा.
त्यामुळेच मुक्तपीठ हे मुक्तमाध्यम आहे. सर्वांचं मुक्तमाध्यम आहे. मुक्तपीठचा उद्देशच आहे. प्रत्येकानं अभिव्यक्त व्हावं. विचार कोणतेही असो. पटो न पटो. बिनधास्त मांडाच. त्यासाठीच आहे हे मुक्तपीठ…आता तुम्हीही सारे सोबत या. पत्रकार इथं लिहितील. पत्रकार इथं व्हिडीओतूनही मांडतील. मात्र, त्यापेक्षा जास्त पत्रकारितेच्या बाहेरच्यांचं माध्यम असावं मुक्तपीठ. ज्यांचा पत्रकारितेशी काहीच संबंध नाही अशांना इथं जास्त मांडू देण्याचा प्रयत्न असेल. मोठ्या माध्यमांसारखंच सर्व काही शक्य नाही. त्यामुळे सर्व बातम्या नसतील, पण सर्वांना आपल्या वाटतील अशा निवडक बातम्या नक्कीच असतील.
चला तर मग…तुम्हीही या सोबत. आता गप्प नाही बसायचं. मोकळेपणानं जे वाटतं ते मांडायचं. आता आहे मुक्तपीठ. आपलं मुक्तपीठ.
महाराजांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान. यातून घेऊन प्रेरणा आकारलेलं आपलं मुक्तमाध्यम.
मुक्तपीठ – बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त!
– तुळशीदास भोईटे
आपले मन:पुर्वक अभिनंदन, सर्व सामान्य माणसाच्या मनातील भावना त्याच्या वर होणार अन्याय मांडण्यासाठी मुक्तपीठ हे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल,
मुक्तपीठच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .
धन्यवाद सर .मुक्तपीठ छान संकल्पना .वेळोवेळी आम्ही यात नक्कीच आमची मते मांडू.
अतिशय छान लेख 👌👌