मुक्तपीठ टीम
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुकेश अंबानी B2B क्षेत्रात मोठी झेप घेत आहेत. त्यांच्याजवळ आता आणखी एक मोठी कंपनी येणार आहे. रिलायन्स रिटेल जर्मन रिटेल कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरीचा भारतीय व्यवसाय ४ हजार ६० कोटी रुपयांच्या अंदाजे करारात विकत घेणार आहे. रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे आणि हा करार त्यांना B2B सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती वाढवण्यास मदत करेल. मिळालेल्या माहितीनुसार, या करारामध्ये कंपनीची ३१ घाऊक वितरण केंद्रे, मेट्रो कॅश अँड कॅरीच्या मालकीची जमीन आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे.
जर्मन कंपनीचा भारतीय व्यवसाय विकत घेण्याच्या शर्यतीत रिलायन्सचा पुढाकार
- मेट्रो कॅश अँड कॅरीचे व्यापारी बँकर्स जेपी मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्स यांनी कंपनीच्या व्यवसायाचे मूल्य सुमारे १ अब्ज डॉलर इतके ठेवले होते.
- थायलंडची सर्वात मोठी कंपनी चारोएन पोकफंड ग्रुपनेही हे खरेदी करण्यात रस दाखवला होता. मात्र नंतर त्यांनी यातून माघार घेतला.
- त्यांनी माघार घेतल्यानंतर जर्मन कंपनीचा भारतीय व्यवसाय विकत घेण्याच्या शर्यतीत रिलायन्स उरली होती.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेट्रो यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती आणि गेल्या आठवड्यात जर्मन कंपनीने रिलायन्स रिटेलच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. मेट्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या दोघांनीही सध्या यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.