मुक्तपीठ टीम
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईच्या घराबाहेरील स्फोटक असलेल्या गाडीचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. अंबानींच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या स्कॉर्पिओ कारच्या मालकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मुंबईतील काही जुन्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आठवणी यामुळे जाग्या झाल्या आहेत. त्यांना या घटनेने १२ वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांचा छोटा भाऊ अनिल अंबानी यांच्याबरोबर झालेल्या घटनेची आठवण करून दिली आहे. त्यावेळी अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरचा घातपाती अपघात घडवण्याचा कट रचला गेला होता. दोन्ही भावांविरोधातील या प्राणघातक कटांमध्ये बरेच साम्य आहे.
दोन भाऊ, घातपाताचे दोन प्रयत्न, बरेच साम्य
साम्य -१
• मुकेश अंबानी प्रकरणात त्यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके ठेवली होती. तीस फुटांच्या परिघातूनच त्यांची गाडी जाताना स्फोट झाला असता तर भलते घडले असते. त्या स्फोटकांची क्षमता तीस फुटातील सर्व काही बेचिराख करण्याची होती. त्यामुळे त्यांचा उद्देश मुकेश अंबानी यांना लक्ष्य करण्याचा कट असावा अशी चर्चा आहे.
• अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात घडवण्याचा घातपाती कट होता. २३ एप्रिल २००९ रोजी विमानतळावर उभ्या असलेल्या अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या गिअऱ बॉक्समध्ये खडे सापडले होते. यामुळे उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टर इंजिन बंद होऊ शकलं असतं. म्हणजे हेलिकॉप्टर पाडण्याचा कट होता, अशी तक्रार झाली.
साम्य -२
• मुकेश अंबानी प्रकरणातील संशयित स्कॉर्पिओ कारचा मालक मुंबई व्यावसायिक मनसुख हिरेन याचा ५ मार्च रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह ठाण्याच्या कळवा खाडीतून सापडला आहे. मोबाइलचे शेवटचे लोकेशन वसई पट्ट्यात सापडले. या प्रकरणात मनसुख तपास यंत्रणांचा महत्त्वाचा दुवा असल्याने त्यांच्या जबानीतून बरंच काही सिद्ध होऊ शकत होते.
• अनिल अंबानी प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पाच दिवसांनंतर २८ एप्रिल, २००९ रोजी हेलिकॉप्टरचे तंत्रज्ञ भरत बोर्गे मृत्यू झाला होता. स्कॉर्पियो मालकाचा मृत्यूप्रमाणेच अनिल अंबानीच्या हेलिकॉप्टर प्रकरणात मुख्य दुवा संशयास्पद परिस्थितीत मरण पावला. त्याचा मृतदेह विरार भागात रुळावर सापडला.
साम्य – ३
• मुकेश अंबानी प्रकरणातील मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई पोलीस यांना एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी पोलीस, एक पत्रकार हे त्यांचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला होता. त्याची चौकशी झाली तर वेगळं काही बाहेर येऊ शकले असते.
• अनिल अंबानीप्रकरणातील हेलिकॉप्टर तंत्रज्ञ भारत बोर्गे या प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा होते. मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी एक पत्र लिहिले होते, या प्रकरणातील एका मोठ्या षडयंत्राकडे लक्ष वेधले होते. गौप्यस्फोट होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
साम्य -४
• मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ठाण्याचे पोलीस उपायुक्त अंबुरे यांनी त्याने खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती दिली. मात्र, हिरेन यांच्या कुटुंबीयांनी ते आत्महत्या करू शकत नव्हते, त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला.
• अनिल अंबानी प्रकरणातील तंत्रज्ञ भारत बोर्गे यांनी आत्महत्या केल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिली होती. मात्र, बोर्गे यांच्या कुटुंबीयांना ती आत्महत्या करूच शकत नसल्याचे ठासून सांगितले होते. पुढे काहीच झाले नाही.
साम्य -५
• मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारचे प्रकरण अद्याप ताजे आहे. आत्ता तपास यंत्रणेच्या हाती काही लागलेलं नाही. या प्रकरणात, मनसुखचा अचानक मृत्यू झाला आणि प्रकरण अधिकच गुंतागुतीचे झाले आहे. यामुळे तपास यंत्रणांना हे प्रकरण उघड करणे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे कदाचित जर व्यवस्थित तपास झाला नाही तर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर घातपात करण्याचा कट तसाच गूढ राहण्याची भीती आहे.
• अनिल अंबानी प्रकरणातील तंत्रज्ञांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. यानंतर मुंबई पोलिसांनी दोन मदतनीसांना अटक केली, परंतु त्यातून काहीच ठोस बाहेर आले नाही. अद्यापही हा संपूर्ण कट उघड झालेला नाही. अनिल अंबानी यांचा घातपाती अपघात घडवण्याच्या कटाचे गूढ अद्याप कायम आहे.