मुक्तपीठ टीम
भाजप खासदार वरुण गांधींनी शेतकरी हिताचं पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलं आहे. ऊसाच्या किंमती वाढवण्यासोबतच शेतकऱ्यांसंदर्भात अनेक मागण्या वरुण गांधींनी या पत्रात केल्या आहेत. मात्र वरुण गांधींच्य़ा या पत्राच्या टायमिंगमुळे भाजपच्या अडचणी वाढू शकतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे. कारण, पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आहेत. तसंच ५ सप्टेंबरला अनेक शेतकरी संघटनांनी मुजफ्फरनगरमध्ये महापंचायतही भरवली होती. त्यामुळे वरुण गांधींचं हे पत्र विरोधकांसह शेतकरी संघटनांनाही मोदी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी, टीका करण्यासाठी आयती संधी देणारं ठरु शकतं. तसेच मोदी सरकारने शेतकरी हिताचं सर्वात मोठी पावलं उचलल्याचा भाजपाचा दावा उघडा पडू शकतो.
शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने वाढवलेले हमीभाव आणखी वाढवण्याची मागणी
- २ पानांच्या य़ा पत्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारे मुद्दे आहेत.
- ऊसाचा किमान हमी दर वाढवा.
- सध्या ऊसाला असलेला ३१५ रुपये प्रति क्विंटलचा भाव हा ४०० रुपये करावा.
- पश्चिम उत्तर प्रदेशच्या भागात ऊसाचं उत्पन्न घेतलं जातं. केंद्राच्या नव्या कृषी धोरणांविरोधात निदर्शनं करण्यात या भागातल्याच शेतकऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे.
- गहू आणि धान्यांच्या उत्पादनांवर अतिरिक्त रक्कम दिली जावी.
- गहू आणि धान्यावर २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे एमएसपीवर अतिरिक्त बोनस मिळाला पाहिजे.
शेतकरी सन्मान निधी दुप्पट करण्याचीही मागणी
- पंतप्रधान किसान योजनेंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट केली जावी.
- या योजनेंतर्गत मिळणारी ६ हजाराची रक्कम वाढवून १२ हजार रुपये केली जावी.
- केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही वर्षाला ६ हजार रुपये द्यावेत.
- डिझेलवर प्रतिलिटर २० रुपयांची सबसिडी दिली जावी.
- वीजबिलांच्या किंमतीतही कपात केली जावी.