मुक्तपीठ टीम
भारत आणि जग कोरोनाशी लढत असतानाही पाकिस्तानची कुरापतखोरी थांबलेली नाही, तसेच ती भाजपाच्या सत्ताकाळात जास्तच वाढली आहे, असे उघड झाले आहे. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीतून २०२०या कोरोना संकट वर्षात पाकिस्तानने आजवर केले नव्हते तेवढे म्हणजे ४ हजार ६४५ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. तसेच काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळापेक्षा भाजपाच्या सात वर्षांच्या सत्ताकाळात पाकिस्तानने युद्धबंदी युद्धबंदी मोडून भारतीय हद्दीत खूप जास्त वेळा आगळीक केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
दहा वर्षात ५२३ वेळा, तर सात वर्षात ११ हजार ४२४ वेळा कुरापत
२०२०मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन सर्वाधिक वेळा झाल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानने सरासरी दिवसाला बारा – तेरा वेळा कुरापत काढली आहे. सन २०२० मध्ये ४ हजार ६४५ वेळा उल्लंघन झाले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर काँग्रेसच्या मनमोहन सिंह यांच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात ५२३ वेळा तर भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षांच्या सत्ताकाळात ११ हजार ४२४ वेळा पाकिस्तानने युद्धबंदी मोडण्याची आगळीक केल्याचे दिसून येत आहे.
२०२१च्या १५ दिवसात ५२४ वेळा युद्धबंदी उल्लंघन
यावर्षीही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहिले आहे. १ जानेवारी २०२१ ते १६ फेब्रुवारी २०२१ या अवघ्या दीड महिन्याच्या दरम्यान सीमेवर ५२४ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे. यावर्षी दिवसाला अकरा वेळा पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.
पाकिस्तानी कुरापतखोरीत तब्बल ४ हजार ६०० पट वाढ – सारडा
पुण्यातील कार्यकर्ते प्रफुल सारडा यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. त्यातून मिळालेली माहिती अनेक गैरसमज दूर करणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रसच्या सत्ताकाळापेक्षा भाजपाच्या सात वर्षांच्या सत्ताकाळात पाकिस्तानची कुरापतखोरीची हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे. सारडा यांनी सांगितले की खरोखरच विश्वास बसत नाही. पण मनमोहन सिंह यांच्या सत्तेचे शेवटचे २००४ हे वर्ष आणि मोदींच्या सत्तेचे २०२० हे सातवे वर्ष अशी तुलना जरी केली तरी पाकिस्तानच्या कुरापतखोरीत तब्बल ४ हजार ६०० पट वाढ झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या सात वर्षांच्या कालावधीत भारत-पाकिस्तान सीमेवर ११ हजार ४२४ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे. या उलट मनमोहन सिंहांच्या नेतृत्वाखालील यूपीए सत्ताकाळात २००४ ते २०१३ दरम्यान फक्त ५२३ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन झाले होते.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंहांच्या सत्तेच्या पहिल्याच २००४ या वर्षात युद्धबंदीचे फक्त एकदाच उल्लंघन झाले होते. त्यानंतरच्या वर्षांमध्ये ते वाढत गेले. २००७मध्ये युद्धबंदी उल्लंघनाचे २१ प्रकार झाले. त्यानंतर २००८ मध्ये ७७, २००९ मध्ये २८, २०१० मध्ये ते ४४ वर पोहचले. २०१३ या यूपीए सत्तेच्या शेवटच्या वर्षात पाकिस्तानने १९९ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४मध्ये भाजपा सत्तेवर आली. त्या पहिल्या वर्षात पाकिस्तानने १५३ वेळा कुरापत काढली. आणि त्यानंतर त्यांची कुरापतखोरी वाढतच गेली.
मोदी सत्ताकाळातील पाकिस्तानी कुरापतखोरी
- २०१४-१५३
- २०१५-१५२
- २०१६-२२८
- २०१७-८६०
- २०१८-१,६२९
- २०१९-३,२३३
- २०२०-४,६४५