मुक्तपीठ टीम
ब्रिटीशकालीन गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील एचएस पांचाळ यांनी ओरेवा कंपनीच्या व्यवस्थापकांनी न्यायालयात सांगितलेला मुद्दा माध्यमांना सांगितला. ही घटना Act of God म्हणजे दैवी प्रकोपामुळे घडल्याचे सांगितले आहे. मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी ओरेवा कंपनीच्या दोन व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच केबल वायर पूल सर्वसामान्यांसाठी खुले करण्याच्या स्थितीत नसून ते गंजलेले असल्याचेही न्यायालयात उघड झाले आहे. तरीही तो अधिकारी तसं म्हणाला, हे विशेष!
मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस!
- फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात स्पष्ट पणे उल्लेख करण्यात आला आहे की, या झुलत्या पुलाला गंज चढला होता.
- तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलाच्या फक्त काही अंशी काम करण्यात आले होते.
- या केबल्सच्या तारांचे ग्रीसिंगही करण्यात आले नाही.
- एफएसएल अधिकाऱ्याने सांगितले की, प्रथमदर्शनी ही जुनी केबल होती.
आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी
- बुधवारी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या आरोपींबाबत अतिरिक्त सरकारी वकील एच.एस. पांचाळ यांना विचारले असता, पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या चौघांपैकी दोघे जण ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक असून, अन्य दोघांनी पुलाचे बांधकाम केले.
- याशिवाय ज्या पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे ते सुरक्षा कर्मचारी आणि तिकीट विक्रेते आहेत.
- गुजरातमधील मोरबी येथील एका ट्रायल कोर्टाने ३० ऑक्टोबर रोजी शतकानुशतके जुना पूल कोसळून झालेल्या १३५ लोकांच्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या नऊ जणांपैकी चार जणांना पोलिस कोठडी तर उर्वरित पाच जणांना ५ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.