मुक्तपीठ टीम
गुजरातमध्ये रविवारी मोरबी येथे झुलता पूल कोसळल्याने १३५ लोकांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे, २ नोव्हेंबरला गुजरातमध्ये राजकीय शोक पाळण्यात येणार आहे.
उद्या गुजरातमध्ये राजकीय शोक…
- मोरबी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी २ नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये एक दिवसीय राजकीय शोक पाळण्यात येणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री गांधीनगर राजभवनात या घटनेबाबत आढावा बैठक घेतली.
- या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- काल रात्री पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर राजभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
- पंतप्रधान मोदींनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
- पंतप्रधान मोदी दुपारी ३.४५ वाजता घटनास्थळी पोहोचलेत.
- त्यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक अधिकारीही उपस्थित असतील.
- नंतर ते रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतील व त्यांची विचारपूस करतील.
नदीत आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता…
- एनडीआरएफचे कमांडंट व्हीव्हीएन प्रसन्न कुमार यांनी सांगितले की, नदीच्या पात्रात काही मृतदेह अडकल्याची भीती आहे.
- आज पुन्हा शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
- दुसरीकडे, मोरबी सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप दुधरेजिया यांनी सांगितले की, बहुतांश लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.