मोबाईल चोरी केल्याच्या संशयावरुन एका तरुणासह त्याच्या मित्राला घरातून बाहेर काढून बेदम मारहाण करुन आणि मारहाणीचे मोबाईलवरुन व्हिडीओ काढून ते व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी नऊ आरोपीविरुद्ध भादवी आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे, याच गुन्ह्यांत गुरुवारी पाच आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना बोरिवलीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपींमध्ये रविंद्र दुलगंज, राहुल बिदलांग हौरजे, रोहित कांगडा, योगेश टाक आणि विजय दुधकांच यांचा समावेश आहे. या वृत्ताला पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांनी दुजोरा दिला आहे.
कांदिवली परिसरात २१ वर्षांचा तक्रारदार तरुण राहतो, तो मूळचा हरियाणाचा रहिवाशी आहे. बुधवारी ६ जानेवारीला तो त्याच्या मित्रासोबत त्याच्या घरी होता, यावेळी त्याच्या घरी आठ ते नऊजणांच्या एका टोळीने प्रवेश केला, या सर्वांनी संगनमत करुन या तरुणासह त्याच्या मित्राला त्याच्या कांदिवलीतील जनता कॉलनीतील राहत्या घरातून मालाड येथील काचपाडा परिसरात ऍक्टिव्हा बाईकवरुन आणले, तोपर्यंत ते सर्वजण त्यांना मारहाण करीत होते. काचपाडा येथे आणल्यांनतर त्यांनी त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्याचे केस आणि मिशा काढून अर्धनग्न केले. तसेच या संपूर्ण घटनेचे मोबाईलवरुन चित्रीकरण केले, ते व्हिडीओ नंतर त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांची बदनामी केली होती. या प्रकारानंतर या दोघांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी या तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आठ ते नऊ तरुणांविरुद्ध ३६५, ३०७, ३२४, ५०६ (२), १४३, १४५, १४७, १४८, भादवी सहकलम ६७ आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांच्या पथकाने या आरोपींचा शोध सुरु केला होता, ही शोधमोहीम सुरु असतानाच पाचही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना दुपारी बोरिवलीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने या सर्वांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्वांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांच्या चौकशीत त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे, त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. दरम्यान बुधवारी घडलेल्या या घटनेने कांदिवली परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.