मुक्तपीठ टीम
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असूनही इथल्या प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती बेरोजगार म्हणून बसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या मागणीसाठी मनसेच्या पुढकारातून इथल्या भूमिपुत्रांनी ७ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ऑल इंडिया पैंथर सेना, अपक्ष नगर सेवक व प्रभागीतील नागरिकांनी आणि मुस्लिम महिला संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, उपोषणकर्त्यांनी भजन लक्ष वेधले. या उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंता जनक झाली आहे. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित उपोषणावर योग्य मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे.
या उपोषणाला अनेकांचा पाठिंबा…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात बेरोजगारांचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे.
जोपर्यंत भूमिपुत्र बेरोजगारांना कामावर घेतले जाणार नाही , तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, उपाध्यक्ष सुनील काळे, जनविकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख, खवातीन – ए – इस्लाम इकार्ड संघटनेच्या महिला पदाधिकारी , नगरसेवक अजय सरकार आल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, युवा जिलाध्यक्ष अजय झलके , त्यागीभाई देठेकर, एकोना गावचे उपसरपंच दिलीप लोहकरे , एकोना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर चवले यांनी पाठिंबा दिला आहे .
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे उपोषण…
- जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात बेरोजगारी वाढली आहे.
- बेरोजगारी हा प्रश्न प्रत्येक घराचा बनला असून यामुळे अनेक गंभीर सामाजिक आर्थिक गुन्हेगारी, आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहे.
- जिल्ह्यात हजारो उद्योग आहेत.
- मात्र शासनाच्या आदेशानुसार उद्योगात स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या देण्यात याव्या या आदेशाचे पालन उद्योग करीत नाही.
- परप्रांतीयांना कामावर ठेवून भूमिपुत्रांना हाकलून लावले जात आहे.
- यावरून प्रशासन व लोकप्रतिनिधी बेरोजगारांच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही हे दिसून येते.
- या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बेरोजगारांनी अखेरची लढाई सुरू केली आहे .