मुक्तपीठ टीम
मुंबईतल्या मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या कामसाठी सकाळीच तोडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे संतप्त स्थानिकांनी कारवाईला विरोध सुरू केला आहे. यात भाजप आमदार अतुल भातखळकरही सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परिणामी, परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री १२ वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्या गेल्या आणि सकाळीच पोलिसांनी लवाजम्यासह ही तोडक कारवाई सुरु केली. त्यामुळे स्थानिकांनी रस्त्यावर उतरून या तोडक कारवाईला विरोध केला. या कारवाईची माहिती मिळताच आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईला विरोध केला. त्यामुळे अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
काय म्हणाले भातखळकर ?
- एमएमआरडीएच्या प्रकल्पासाठी कोणतीही नोटीस न देता घरं तोडण्यात येत आहेत.
- त्याला आम्ही विरोध केला होता. काल रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी 9च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली.
- भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली.
- लोकांना मारहाण करत घराबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं.
- पोलिसी दंडुका दाखवत एकाला एका, तर दुसऱ्याला दुसऱ्या ठिकाणी ताब्यात घेऊन मोगलाई पद्धतीने आमच्यावर कारवाई करण्यात आली.
- पण आमचा लढा सुरू राहील. हे बांधकाम आम्ही होऊ देणार नाही.
- आम्हाला योग्य घरं मिळाली पाहिजे. झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन झालंच पाहिजे.
- आम्ही आंदोलन करणारच.
- हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. असं असतानाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली.
- याच्याविरोधात आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू.