अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या वरळी मतदारसंघातून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीस सामोरे गेले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण थेट निवडणूक लढवून लोकांमधून निवडून येणाऱ्या या पहिल्या ठाकरेंनी सुरु केलेला कामांचा धडाका आता चर्चेत आहे. राज्य मंत्रिमंडळात पर्यावरणमंत्री असणारे आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील विकासाचा वरळी पॅटर्न मतदारांच्या कौतुकाचा विषय आहे. आता राज्यात विकासाचा वरळी पॅटर्न इतरत्रही राबवण्याच्या तयारीत ते असल्याचं त्यांच्या ट्वीटवरून उघड होत आहे.
अॅनी बेझंट मार्गावरील पुनम चेंबर्सच्या येथे High visibility signals आणि चांगल्या फुटपाथना आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. आजही वरळीतील इतर काही भागात असे सिग्नल्स बसवण्यात आले. pic.twitter.com/VFCxDS3zLn
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2021
सेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या वरळीत पारंपरिकता जपतानाच अत्याधुनिकतेकडे वळणारा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरक्षित – आकर्षक पदपथ, उड्डाणपुलाखालील उद्यान, समुद्रकिनारा परिसर सुशोभीकरणासह विविध विकासकामांचा वरळी आणि परिसरात काम जोरात सुरू आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार ही कामे होत आहेत. यातील काही कामांचा आढावा आदित्य ठाकरे यांनी नुकताच घेतला.
वरळीत विभाग आणि परिसरात अनेक विकासकामे आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात येत आहेत. या कामातील सेनापती बापट मार्ग, दादर उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत तयार होणाऱ्या उद्यानाच्या कामाचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतला. तसेच प्रभादेवी येथील समुद्रकिनारा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणीदेखील आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच श्री गणेश विसर्जन जेट्टी, वरळी पोलीस कॅम्पपासून आरजी थडानी मार्गापर्यंत सर पोचकनवाला रोडवरील फुटपाथ तसेच पथदिव्यांच्या कामाचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतला. नरिमन भट विसर्जन पॉइंटच्या प्रस्तावित सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करून त्यास एक सुंदर घाट बनविण्याच्या कामाला सुरुवात केली. निडर सामर्थ्याचे प्रतिक असलेला ‘झेबु बुल’ आता लोटस जंक्शनला थाटात उभा आहे. डीलाईल रोडवरील रोड ओव्हरब्रिजच्या कामाला आदित्य ठाकरे प्रत्येक महिन्याला भेट देत आहेत हे काम काटेकोरपणे वेळेत पूर्ण होईल आणि वाहतुकीची कोंडी लवकरच कमी होईल यासाठी रेल्वे आणि महानगर पालिका यांच्याशी समन्वय साधत आहोत.
पर्यावरणमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच आदित्य ठाकरे आमदार म्हणूनही आपलं कर्तव्य बजावतात, असंही एका महिला पदाधिकाऱ्याने सांगितलं. त्या म्हणाल्या, आदित्य ठाकरे स्वच्छ, सुंदर, सुरक्षित वरळी करण्यासाठी वेगाने काम करत आहेत. या विकासकामांतील वरळी नाका येथील आचार्य अत्रे चौकातील पदपथ सुशोभीकरण, नवीन वाहतूक पोलीस चौकी, निरीक्षण केंद्र निर्मिती आणि डॉ . अॅनी बेझंट रोड लोटस येथील सुशोभित उद्यान आणि नंदीच्या भव्य प्रतिकृतीचे लोकार्पण यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
अॅनी बेझंट मार्गावरील पुनम चेंबर्समधील हाय व्हिजिब्लिटी सिग्नल बसविण्यात आले आहेत. यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्थाही अधिक सुरक्षित होणार आहे. पालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाची संकल्पना शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची असून त्यांनी उपक्रम राबवल्याबद्दल पालिकेचे कौतुक केले आहे. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक व इतर शहरांमध्येही असे High visibility signals बसवण्याची विनंती गृहमंत्र्याकडे केली आहे.