मुक्तपीठ टीम
रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र, प्रवासी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आरपीएफचे जवान रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उत्कृष्ट सेवा देत आहेत. ते गरजू प्रवाशांना मदत करतात आणि मदत आणि संरक्षणाची गरज असलेल्या महिला आणि मुलांच्या मदतीसाठी धावून जातात. या दलातील जवान त्यांना नेमून दिलेल्या कर्तव्याच्या पलिकडे जाऊन विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. त्यांच्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी, जानेवारी २०२२ पासून वेगवेगळ्या नावाने अनेक मोहिमा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे जवान कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची पर्वा न करता रात्रंदिवस विविध रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे परिसरात धावत्या गाड्यांच्या चाकाखाली येण्याचा धोका असलेल्या कित्येक व्यक्तींचा जीव वाचवत आहेत . आता “मिशन जीवन रक्षा” अंतर्गत मिशन मोडमध्ये हे काम हाती घेण्यात आले आहे. आरपीएफच्या जवानांनी जानेवारी २०२२ मध्ये या मिशन अंतर्गत ४२ व्यक्ती, २० पुरुष आणि २२ महिलांना वाचवले आहे .
मदत आणि संरक्षणाची गरज असलेल्या, आपल्या कुटुंबापासून हरवलेल्या/विभक्त झालेल्या किंवा अनेक कारणांमुळे घरातून पळून गेलेल्या मुलांची कुटुंबियांशी पुन्हा भेट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वेळेत त्यांचे संरक्षण केले नाही तर त्यांचे शोषण आणि तस्करी होण्याचा धोका असतो. या उदात्त कार्यासाठी दलातील जवानांना प्रेरित करण्यात येत असून “ऑपरेशन नन्हें फरिश्ते ” या शीर्षकाखाली देशभरात कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
जानेवारी २०२२ मध्ये, भारतीय रेल्वेच्या संपर्कात आलेल्या मदत आणि संरक्षणाची गरज असलेल्या १०४५ मुलांना (७०१ मुले + ३४४ मुली) स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने पाठपुरावा करून वाचवण्यात आले. सध्या भारतीय रेल्वेच्या १३२ रेल्वे स्थानकांवर लहान मुलांसाठी मदत कक्ष कार्यरत आहेत.