मुक्तपीठ टीम
ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन देणारे मंत्रालयाच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला मंत्रालयातील अधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विभागाच्यावतीने दि. १८ ते २१ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाला भेट देतांना ग्रामीण कारागिरांनी लाकडाच्या माध्यमातून तयार केलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे सुताने तयार केलेला हार अर्पण करुन मंत्री उदय सामंत यांनी अभिवादन केले. या प्रदर्शनात राज्यभरातून सहभागी झालेल्या उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. मतिमंद, अपंग मुलांनी तयार केलेल्या सुबक पणत्या, शोभेच्या वस्तू, कागदी फुले आणि महिला उद्योजकांनी तयार केलेले खाद्य पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, मध, साबण आणि सुगंधीत उटण्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
राज्यातील अमरावती, जळगाव, सांगली, सातारा, वर्धा, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. महाबळेश्वर येथील मध व वर्धा येथील सेवाग्रामची खादी तसेच लाकडी वस्तू, मसाले, देशी गाईचे तूप, तांब्यावरील नक्षीकाम केलेली भांडी, दिवाळीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, साबण व इतर गृहपयोगी वस्तु या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.