मुक्तपीठ टीम
देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात शुक्रवारपर्यंत ६४ हजार ५९९ सक्रिय रुग्ण, तर मुंबईत ५४ हजार ८०७ सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली असून पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी निर्बंध जाहीर केले आहेत.
मॉल, मल्टिप्लेक्स, थिएटर, हॉटेल-रेस्टॉरंट आणि दुकानांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरी, पार्सल व्यवस्था आधीच्या आदेशानुसार सुरू राहणार आहे. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. एका ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमल्यास, प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.
असे आहेत निर्बंध
- पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे.
- पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.
- अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे.
- इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे.
- संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत.
- सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
- मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे.
- गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे.
- शाळा, महाविद्यालयं ३० एप्रिल पर्यंत बंद असणार आहेत. तर, यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियोजन सुरू आहे.
- स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांटी गैरसोय होऊ देणार नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
- मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड.
- थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड
दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर देणं. आरोग्य सुविधा बळकट करणं, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे हे आवश्यक आहे. काल महत्वाच्या रूग्णालयांसोबत एक बैठक झाली, त्या अनुषंगाने आपण रूग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवत आहोत. जर रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच काही रूग्णालयांना आपल्याला १०० टक्के कोरोना रूग्णालय म्हणून घोषित करावं लागेल, असे आयुक्त सौरभ राव म्हणाले,