मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे आता मुंबई आणि महाराष्ट्रावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचं सावट आलं आहे. या पाश्वभूमीवर कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची विनंती काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी केली आहे.
मिलिंद देवरा यांनी ट्विट करत देशाचे आर्थिक हित जपण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र आले पाहिजे. मुंबईत वेगाने लसीकरण मोहीम राबवली पाहिजे. प्रत्येक मुंबईकराला लस दिली पाहिजे, असे मिलिंद देवरा यांनी सांगितले.
देशातील कोरोना रुग्णसंख्येपैकी १० टक्के नवीन रुग्ण एकट्या मुंबई शहरातील आहेत. तर त्याचबरोबर देशाच्या एकूण जीडीपीपैकी ६ टक्के वाटा मुंबईचा आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीच्या हितासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने एकत्र यायला हवे. तसेच प्रत्येक प्रौढ मुंबईकरांचे होईल, तितक्या लवकरच लसीकरण करायला हवे, असे मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरांतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतकच नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
उद्योगपती महिंद्रांनीही केली होती महाराष्ट्रासाठी मागणी
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही महाराष्ट्र आणि मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असल्याने येथे विशेष लक्ष देण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रातील प्रत्येकाचे लसीकरण करण्याचा मार्ग त्यांनी सुचवला होता.