मुक्तपीठ टीम
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) २०२३ मध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचा पहिला टप्पा – आरे ते बीकेसी मुंबईकराच्या सेवेत आणण्यासाठी सज्ज आहे. “२०२३ मध्ये आम्ही मेट्रो-३ मार्गावरील आरे ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा सुरू करणार आहोत”, असे मुं.मे.रे.कॉ.च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. “मुं.मे.रे.कॉ. च्या मेट्रो-३ मार्गासाठी कालच दुसऱ्या ट्रेनचे सर्व आठ डबे शहरात दाखल झाले असून लवकरच ते एकत्र करून त्याची चाचणी घेतली जाईल. उल्लेखनिय बाब म्हणजे यापूर्वीच पहिल्या ट्रेनने १,५०० किमी पेक्षा जास्त ट्रायल रनद्वारे सर्व डायनॅमिक आणि स्टॅटिक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत”, असेही अश्विनी भिडे म्हणाल्या.
२९ डिसेंबर २०२२ रोजी आंध्र प्रदेशातील सिटी येथील ऑल्स्टॉम प्लांटमध्ये तयार झालेली दुसरी ८ डब्यांची ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. या ट्रेनच्या सारिपुत नगर आणि सहार येथील रॅम्प दरम्यान ५ किमीच्या अंतरावर आवश्यक चाचण्या घेतल्या जातील. प्रत्येकी ४२ टन वजनाचे हे सर्व ८ डबे ६४ चाकांच्या विशेष ८ ऍक्सेल ट्रेलरने १० दिवसांत आंध्र प्रदेशातून १,४०० किमी अंतर पार करत मुंबईत दाखल झाले आहेत.
याशिवाय, २०२२ मध्ये मुं.मे.रे.कॉ.ने काही उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत. “मुं.मे.रे.कॉ.ने ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ५४.५ किमी अप आणि डाउन मार्गाचे संपूर्ण भुयारिकरणाचे काम पूर्ण केले. १७ टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) आणि १,७०० कामगारांच्या सहाय्याने ३३.५ किमी लांबीचे भुयारी मार्ग बनवण्याचे काम १००% पूर्ण झाले आहे.”, असे मुं.मे.रे.कॉ.चे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता यांनी सांगितले. या कामासाठी एकूण २,८६,००० घनमीटर काँक्रीट आणि २९,५०० मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला असून ट्रॅक टाकण्याचे कामही ५०% पूर्ण झाले आहे, अशीही माहिती एस. के. गुप्ता यांनी दिली.
आता प्रणाली कामाचा आढावा घेऊ, “स्टॅटिक आणि डायनॅमिक अशा विविध चाचण्यांसह ट्रेनच्या इतर चाचण्या नियमितपणे सुरू आहेत. ओव्हरहेड कॉन्टॅक्ट सिस्टीम (ओसीएस) चे ५३% तर वीज जोडणी प्रक्रिया बसवण्याचे ८८% काम पूर्ण झाले आहे. या व्यतिरिक्त, १०५ सरकते जीने (एस्केलेटर), १९ उद्वाहक (लिफ्ट), १० प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि १२ प्रवासी माहिती डिस्प्ले सिस्टीम विविध स्थानकांवर बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रणालीतील इतर कामे जोमात सुरू आहेत, असे मुं.मे.रे.कॉ.चे संचालक (प्रणाली) ए. ए. भट्ट यांनी सांगितले.
मुं.मे.रे.कॉ.ला टनेलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (टीएआय) च्या वतीने आयोजित केलेल्या टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस अवॉर्ड्स २०२२ हा पर्यावरण उपक्रमासाठीचा वार्षिक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.