पुरुषांनाही कौटुंबिक हिंसाचाराचे लक्ष्य व्हावं लागत असल्याचा आरोप वास्तव फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. पुरुषांवरील अत्याचारांची दखल घेणारी स्वतंत्र हेल्पलाइन स्थापन करणे व पुरुष आयोग स्थापन करण्याच्या मागण्यांबाबतही पत्रात उल्लेख आहे.
वास्तव फाऊंडेशनच्या पत्रानुसार, “सध्या सर्वजण घरामध्येच लॉक डाउन असल्याविशेषतः असंतोषाच्या संबंधांमध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या पसरत आहेत. स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागल्यास त्यांना अनेक मार्ग उपलब्ध आहेत परंतु पुरुषांसाठी काहीही मार्ग उपलब्ध नाहीत.”
“बऱ्याच वेळा नाईलाजाने पुरुष दुःख भोगतात व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त होतात. अश्या परिस्थितीत आम्ही आमच्या हेल्पलाइनला अश्या पीडित पुरुषांना व त्यांच्या कुटुंबातील महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना समर्पित करू इच्छितो ज्यांना कौटुंबीक हिंसाचारास सामोरे जावे लागले.”
“आमची आपणास अशी विनंती आहे की आमच्या संस्थेच्या हेल्पलाइनला (८८८२४९८४९८) सरकारी मान्यता द्यावी व ज्याप्रमाणे स्त्रियांसाठी सरकारमान्य महिला आयोग असून त्यांची ज्याप्रकारे मदत केली जाते त्याचप्रमाणे पीडित पुरुषांसाठी देखील सरकारमान्य पुरुष आयोग असावा.”