मुक्तपीठ टीम
“शिवसेना नेते संजय राउत यांनी दहशत/भीती निर्माण करण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी १०० कोटी शौचालय घोटाळ्याचे खोटे आरोप करीत आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.” अशी याचिका/खटला प्रा. डॉ. मेधा किरीट सोमैया यांनी आज शिवडी, मुंबई कोर्टात दाखल केला.
भारतीय दंड संहिता कलम ४९९ व ५०० च्या अंतर्गत संजय राउत यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी विनंती शिवडी येथील मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट २५ नं. न्यायालय येथे प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी केली आहे.
- गेले अनेक आठवडे संजय राउत यांनी प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केला आहे, १०० कोटी रुपयांचा अपहार केला आहे असे सातत्याने वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमांसमोर सांगत आहेत.
- प्रा. डॉ. मेधा सोमैया व युवक प्रतिष्ठान यांनी मिळून अश्या प्रकारची फसवणूक केली असून त्यांची लवकर अटक होणार अशा प्रकाराचे ही विधान अनेक वेळा करण्यात आले.
- प्रा. डॉ. मेधा सोमैया यांच्या विरोधात पोलीस दखल घेत असून आर्थिक गुन्हे विभागाद्वारा एफआयआर होत आहे. त्याच बरोबर मँग्रोव्ह विभाग पर्यावरण खात्यातर्फे ही चौकशी चालू असून कारवाई करण्यात येत आहे असेही भाष्य संजय राउत यांनी केले.
- डॉ. मेधा सोमैया, युवक प्रतिष्ठान यांनी कोणताही घोटाळा केला नसून १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही असे प्रतिपादन या याचिकेत करण्यात आले आहे.
- भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्या पत्नी प्रा. डॉ. मेधा सोमैया यांना बदनाम करून भितीचे वातावरण सोमैया परिवारामध्ये उभे करणे हाच संजय राउत व शिवसेनेचा हेतू असल्याची तक्रार आहे.
- अश्याच पद्धतीने संजय राउत यांनी २०१६ मध्ये प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी ११८ कोटींचा एसआरए (SRA) घोटाळा केला असल्याची बोंबाबोंब व अपप्रचार केला होता. त्यावेळी प्रा. डॉ. मेधा सोमैया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कानथावाला यांनी संजय राउत व सामना वर्तमानपत्रावर त्या/या पुढे कोणतीही बदनामी करण्याचे विधान करू नये अश्या प्रकाराची ताकीद सुद्धा दिली होती.
प्रा. डॉ. मेधा सोमैया समवेत डॉ. किरीट सोमैया यांनी आज शिवडी न्यायालयात हा खटला दाखल केला असून पुढच्या आठवड्यापासून याची सुनावणी सुरु होईल असा विश्वास ही व्यक्त केला आहे.