मुक्तपीठ टीम
सुमारे ७० लाख रुपयांच्या एमडी आणि चरसचा साठा जप्त करुन पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. मालाड आणि मशिदबंदर येथून गुन्हे शाखेसह आझाद मैदान युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जॉन डेव्हीड जोसेफ, धर्मेद्र राजेंद्र मिश्रा आणि राहुल दसरतलाल शर्मा अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील जॉनकडून ३० लाख रुपयांचे ३०० ग्रॅम एमडी तर धर्मेंद्र आणि राहुलकडून ४० लाख रुपयांचे १ किलो २०० ग्रॅम वजनाचे चरस पोलिसांनी जप्त केले आहे. सोमवारी रात्री पोलीस आझाद मैदान युनिटचे अधिकारी ड्रग्ज तस्करीतील आरोपींच्या कारवाईसाठी परिसरात गस्त घालत होते, रात्री नऊ वाजता या पथकाला मशिदबंदर येथील वाडीबंदर, कल्याण स्ट्रिट पोलजवळ काहीजण ड्रग्जची खरेदी-विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसवेकर, पोलीस नाईक पवार, पोलीस शिपाई चव्हाण, इधे, निंबाळकर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी रात्री उशिरा तिथे एक तरुण दुसर्या तरुणाला जांभळ्या रंगाची कापडी पिशवी देत होता, हा प्रकार संशयास्पद वाटताच या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशीत त्यांची नावे धर्मेंद्र मिश्रा आणि राहुल शर्मा असल्याचे उघडकीस आले. या पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना १ किलो २०० ग्रॅम वजनाचे चरस सापडले, या चरसची किंमत सुमारे ४० लाख रुपये आहे.
ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, याच गुन्ह्यांत त्यांना पोलिसांनी अटक केली. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक मानसिंग काळे हे करीत आहेत. ही कारवाई ताजी असतानाच कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी जॉन जोसेफला अटक केली. मालाड परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, या माहितीनंतर सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, सुधीर कोरंगावकर, अंमलदार नरेंद्र मयेकर, अविनाश शिंदे, दिलीप वाघरे, दिपक कांबळे, राजू गारे, सुबोध सावंत, सत्यनारायण नाईक, राजेश चव्हाण, महादेव नावगे, राकेश लोटणकर, जयेश केणी, अजय कदम, सचिन कदम, चालक उपेंद्र मोरे यांनी मालाड येथून जॉन जोसेफला चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ३०० ग्रॅम वजनाचे एमडी सापडले, या एमडीची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे. त्याच्याविरुद्ध नंतर मालाड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता, गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
जॉन हा मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, शारीरिक दुखापत करणे, चोरी अशा अनेक गंभीर गुन्हयांची नोंद आहे. त्याला यापूर्वी मुंबई आणि ठाणे शहरातून हद्दपार करण्यात आले होते, हद्दपारीचे आदेश असतानाही तो एमडी ड्रग्ज विकण्यासाठी मालाड परिसरात आला होता. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील हे करीत आहेत.