मुक्तपीठ टीम
स्पेनमधून आलेली बातमी धक्कादायक आहे. जगप्रसिद्ध अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी मॅकॅफीचे संस्थापक जॉन मॅकॅफी यांचा मृतदेह बुधवारी स्पॅनिश तुरुंगात सापडला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. मॅकॅफी यांच्या अमेरिकेत प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्यानंतर काही वेळातच तुरुंगाच्या कोठडीत त्यांचा मृतदेह सापडला. अमेरिकेत मॅकॅफीवर कर चुकल्याचा आरोपावरून कारवाई सुरु होती, ज्यात ३० वर्षे तुरुंगवासाची शक्यता होती. तसेच त्यांना शेजाऱ्याच्या खूनाप्रकरणी २५ दशलक्ष डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला होता.
तुरुंग विभागाच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की, ७५ वर्षीय मॅकॅफी यांनी आत्महत्या केली असावी. मात्र, त्या प्रवक्त्यांनी इतर कोणतीही माहिती दिली नाही.
अँटीव्हायरस निर्मात्यांच्या मनात कसा शिरला आत्महत्येचा व्हायरस?
- मॅकॅफी यांच्यावर २०१४ ते २०१८ दरम्यान जाणीवपूर्वक कर परतावा भरला नसल्याचा आरोप होता.
- तसेच २०१२मध्ये त्यांना शेजाऱ्याच्या खूनाप्रकरणी २५ दशलक्ष डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला होता, त्यांनी तोही भरण्यास नकार दिला होता.
- मॅकॅफी यांना २०२०च्या ऑक्टोबरमध्ये बार्सिलोना विमानतळावर अटक करण्यात आली होती.
- त्यावेळी ते इस्तंबूलला जाणार होते.
- तेव्हापासून ते स्पेनच्या तुरुंगात होते.
- त्यांचे अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यास न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृतदेह तुरुंगाच्या कोठडीत सापडला.
- मॅकॅफीला दोषी ठरविण्यात आले असते तर त्यांना किमान तीस वर्षे गडाआड राहावे लागले असते.
- बहुधा ७५ वर्षांच्या मॅकॅफी यांना ती कल्पनाच असह्य वाटली असावी.