मुक्तपीठ टीम
कितीही पैसे गेले तरी चालतील पण मला चांगल्या रुग्णालयात बेड मिळवून द्या. काही करा पण सरकारी नको चांगले खासगी रुग्णालयच पाहिजे. कोरोना संकटात बेड मिळत नसतानाही रोजच असे कानी येते. एकीकडे खासगी रुग्णालयं लुटतात अशी तक्रारी केल्या जात असतानाच खासगीकडेच धाव का, याची माहिती घेतली तर लक्षात येते खासगीतील चकचकाट, स्वच्छता लोकांचा विश्वास कमावते. पण आता काळ बदलतोय. सार्वजनिक रुग्णालयंही कात टाकू लागलीत.
आता हे रुग्णालय पाहा. स्वच्छ. सुंदर. चकचकीत फरशी. रुग्णांचे आधुनिक बेड. रुग्णांमध्ये पार्टिशन. देखभाल करण्यासाठी डॉक्टर आणि अन्य आरोग्य रक्षकांची सुसज्ज टीम. पाहताना वाटतं रुग्णालय असावं तर असं. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या मोठ्या रुग्णालयासारखं. हे रुग्णालय खासगी नाही. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचंही मुळीच नाही. ते आहे, मीरा भाईंदर मनपाचे मीनाताई ठाकरे कोरोना उपचार केंद्र. ते सध्या मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर वन रुपी क्लिनिक ही रुग्णसेवेची अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या डॉ. राहुल घुले यांच्या टीमकडून चालवले जात आहे.
डॉ. राहुल घुले आणि त्यांची वन रुपी क्लिनिकची टीम कोरोना संकटात आघाडीवर लढत असते. त्यांच्या टीमने कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील वरळीत बीडीडी चाळीत महत्वाची कामगिरी बजावली. त्याच टीमने कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील इतर उपनगरांमध्ये कोरोना उपचार केंद्रांची जबाबदारी सांभाळली. ज्या वेळी सरकारला, महापालिकांना मोठे पगार देऊनही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी मिळणे कठिण झाले तेव्हा डॉ. राहुल घुले यांनी ते मिशन इम्पॉसिबल हाती घेतले आणि करुन दाखवले. आताही त्यांनी सतत, अविरत रुग्णसेवेच्या मिशनसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांच्या समर्पित सेवाकार्याला मुक्तपीठ टीमकडून सलाम आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा!
पाहा व्हिडीओ: