मुक्तपीठ टीम
हॉटेल, हॉस्पिटल्स आणि लसीकरणाच्या पंचतारांकित पॅकेजविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने राज्यांना कारवाई आदेश दिले. त्यानंतर आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हॉटेल ललितवर धडकल्या. धक्कादायक बाब अशी की तिथं क्रिटीकेअर या खासगी रुग्णालयानं साध्या फ्रिजमध्ये लसी ठेवण्यासाठी वापरल्याचे उघडकीस आले. त्यामुळे उलट लस घेतल्याचे समाधान वाटेल पण प्रत्यक्षात पुढे त्याचा वेगळा दुष्परिणाम होईल, अशी भीती महापौरांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी केंद्र खासगी पॅकेजविरोधात कारवाई करण्यासाठी सांगत असताना त्यांनीच मुंबई मनपाला न मिळणारी को-वॅक्सिन लस खासगी रुग्णालयांना मिळते, असा प्रश्नही महापौरांनी उपस्थित केला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी हॉटेल ललितची तपासणी केली. तेथे हॉटेलने त्यांच्यातर्फे लसीकरण पॅकेज नसल्याचा दावा केला. मात्र, तेथे क्रिटीकेअर या रुग्णालयाकडून लसीकरण केले जात असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब अशी की पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या लसीकरणासाठी क्रिटीकेअरने साध्या फ्रिजचा वापर केला आहे, असे महापौरांनीच माध्यमांना सांगितले.
- कालपर्यंत ललित हॉटेलमध्ये लसीकरण झाले, हे नक्की आहे.
- त्यांच्या फाइलनुसार, दिवसाला त्यांनी पाचशेपर्यंत लसीकरण केले आहे.
- तेथे आम्हाला को-वॅक्सिनच्या चीट सापडल्या आहेत.
- येथे हा प्रकार असा दिसतोय, क्रिटी केअर रुग्णालयाने केंद्राकडून परवानगी घेतली आणि त्यांना को-वॅक्सिन लस मिळाली.
- पण मला यांच्या फ्रिजबद्दलही डाऊट आहे. कारण तापमान राखावं लागतं.
- आपलं तापमान हे नेहमीच्या फ्रीजमध्ये ठेवायचे नाही.
- कोणत्याही नागरिकाच्या जीवाला धोका होऊ नये. त्यांना नुसतं समाधान की मी लस घेतली आणि नंतर दुष्परिणाम होतील, असे नको.
- ललित हॉटेलने दोन डॉक्टर घेतलेले आहेत. तेथे असलेल्या ग्राहकाने लस घेतल्यानंतर काही त्रास होत असेल तर त्यांना तपासले जाते.
- जर आपल्याला मुंबई मनपाला को-वॅक्सिन मिळत नाही. पण जर कॉर्पोरेटला ती लस विकत घेऊ देत असतील, त्यांना केंद्र परवानगी देत असेल. तर मला लोकांना सांगायचे आहे की मुंबई मनपा तर तर लोकांना मोफतच देत आहे. तापमान राखण्यासाठी योग्य ठिकाणी लस ठेवत लसीकरण करत आहोत.
- ललित हॉटेलचा या लसीकरणाशी संबंध नाही, पण ज्यांनी ही जागा घेतली आणि क्रिटी केअर रुग्णालयाने लसीकरण केले, ते कशाप्रकारे करतात, ते अशा साध्या फ्रिजमध्ये स्टोरेज करत असतील तर हे वेगेळे आहे. त्याची चौकशी केली जाईल.
- क्रिटीकेअरने कॉर्पोरेट कंपन्यांसाठी येथे लसीकरण केले आहे.
कोरोना लसी योग्य तापमानात ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी मुंबई मनपा तसेच इतर सार्वजनिक आरोग्य सेवेतील रुग्णालयंही खास साधनं वापरतात. परंतु पंचतारांकित रुग्णालयात सुरु असलेल्या लसीकरणासाठी मात्र साध्या फ्रिजचाच वापर केला जात आहे. कोरोना लसी योग्य तापमानाला ठेवल्या नाहीत तर त्या खराब होतात, त्यामुळे तिथं झालेल्या लसीकरणाचा ती घेतलेल्यांना उपयोग होईल का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी क्रिटीकेअर रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.