सध्या मुंबईत वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आंशिक लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.
सामान्य मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन केले तर कोरोना संसर्गाप्रमाणेच लॉकडाऊनला टाळणे शक्य आहे.
“धार्मिक स्थळे, बाजारपेठ आणि लोकल गाड्यांमध्ये ज्या प्रकारे गर्दी वाढत आहे त्यामुळे मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, त्यावरून आंशिक लॉकडाऊन घालण्याची गरज असल्याचे दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच यासंदर्भात महापालिकेशी चर्चा करून निर्णय घेतील.” असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुंबईत १४ फेब्रुवारीपासून दररोज कोरोना रूग्ण संख्या १,१०० ते १,५०० दरम्यान वाढताना आढळली. यावर त्या म्हणाल्या, “आम्हाला आशा आहे की, लवकरच मुंबईतील परिस्थिती पुन्हा सुधारेल. परिस्थिती आणखी बिकट झाल्यास काही कठोर निर्बंध लावावे लागतील.”
महाराष्ट्रात कोरोनाचे १५,८१७ नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर मुंबईत १,६४७ प्रकरणे नोंदली गेली आहेत. गेल्या दोन दिवसांत मुंबईतील कोरोना रूग्णांचे प्रमाण ७ टक्क्यांनी वाढले आहे.
लसीकरण वाढवणार
खासगी रूग्णालयात २४ तास लसीकरण करण्यास परवानगी दिल्यानंतर, महापालिका देखील केंद्रांमधील वेळेची मुदत वाढवण्याच्या विचारात आहे. त्याअंतर्गत, लसीकरण केंद्रात येणाऱ्या शेवटच्या व्यक्तीचे लसीकरण होईपर्यंत ही केंद्रे खुली राहतील.