मुक्तपीठ टीम
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ झाल्याने नागरिकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ९६२ नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या मृत्यूची संख्याही गुरुवारपेक्षा १६ने वाढली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ४१६ वर गेली आहे.देशातील कोरोनाच्या या वाढत्या प्रमाणाची गंभीर दखल न्यायालयानेही घेतल्याचे दिसत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता विमानतळ आणि विमानांमध्ये मास्क वापरण्याची सक्ती योग्य असल्याचं म्हटलं आहे. तसं न करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्याची बंदी करण्यापासून काळ्या यादीत टाकले जाणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने, “विमानतळ आणि विमानात मास्क घालणे आणि हात धुण्याशी संबंधित नियम हा आदेश योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे, कारण महामारी अजून संपलेली नाही आहे.”
‘या’ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
- न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्यांवर केवळ गुन्हा दाखल केला पाहिजे असे नाही तर त्यांना दंडही ठोठावला पाहिजे.
- अशा लोकांना ‘नो-फ्लाय’ या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
- नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी कठोरता आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
- प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, नियमांचे पालन गांभीर्याने होत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे, त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयासह इतर संस्थांनी नियमांचे पालन सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, “यासाठी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअरलाइन्सना स्वतंत्र बंधनकारक सूचना जारी कराव्यात, जेणेकरून ते कर्मचारी, एअर होस्टेस, कॅप्टन, पायलट, विमानतळ आणि विमानातील इतर कर्मचाऱ्यांना प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याचे अधिकार देतील. जे मास्क घालणे आणि हात धुणे यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळतात.”
नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना
- न्यायालयाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वकील अंजना गोसाईंच्या युक्तिवादाची दखल घेतली की नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने १० मे रोजी आणखी एक आदेश जारी केला होता.
- ज्यामध्ये कोरोनापासून प्रतिबंध करण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले होते.
- गोसाईंना स्वतः कोरोनाची लागण झाली असून त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावली होती.
- त्या म्हणाल्या की, विमानतळ आणि विमानांमध्ये मास्कशी संबंधित नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.
जनहित याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला
- न्यायालयाने सांगितले की मार्गदर्शक तत्त्वे आधीपासूनच आहेत आणि त्यांचे योग्यरित्या पालन केले जात नाही, ही खरी समस्या आहे.
- मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पावले उचलण्यात यावीत, असे खंडपीठाने सांगितले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जुलै निश्चित केली.
- उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाच्या अनुभवाच्या आधारे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला.
- ८ मार्च २०२१ रोजी न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी मास्क घातलेले नसल्याचं निरीक्षण केल्यावर न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी परिस्थितीची स्वतःहून दखल घेतली होती.