मुक्तपीठ टीम
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये मोठा मोर्चा काढला. ओबीसी आरक्षणासाठीच्या या महामोर्च्याला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे केवळ मराठवाडाच नाही तर राज्यभरात आरक्षण आंदोलनाची एक नवी लाट उसळण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळत नसल्यानं मराठा समाजात वाढणाऱ्या संतापाची झलक या मोर्चातून दिसली. आधी आघाडी सरकार, नंतर भाजपा सरकार आणि पुन्हा महाविकास आघाडी अशी अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर निराशाच होत असल्याने आता मराठा समाजाच्या भावना संतप्त आहेत. आर्थिक शैक्षणिक मागासलेपणाच्या मुद्द्यावर मिळणारं टिकणारं नाही, त्यात पुन्हा इंद्रा साहनी प्रकरणानंतर आरक्षणानंतर ५० टक्के मर्यादेचाही मोठा अडथळा आहे. त्यामुळेच आता मराठा समाजाचा गायकवाड आयोगाच्या शिफारशींनुसार ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून गेले काही दिवस मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून सुरक्षित आरक्षण देण्याची मागणीने जोर धरला आहे. आता तसं आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजातील अनेक मान्यवर प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मराठा समाजाने धाराशिवमधील कळंबमध्ये महामोर्चा काढण्यात आला.
कळंबच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेल्या या महामोर्चामुळे शहर ओसंडून वाहून गेलं. “एक मराठा,लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचे,नाही कुणाच्या बापाचे” अशा घोषणा दुमदुमत असताना शिस्तबद्धरीत्या समाजाचा महामोर्चा निघाला.
कळंब शहरात सर्वत्र मोर्चेकऱ्यांच्या स्वागतासाठी खास स्वागत कमानी, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. मोर्चेकऱ्यांमुळे इतरांना त्रास होऊ नये, यासाठी मोर्चे आयोजकांनी वाहन पार्किंगची, इतर आवश्यक तयारी केली होती.