योगेश केदार / व्हाअभिव्यक्त!
आदरणीय पवारसाहेब,
मुठभर साखर कारखानदारांच्या हितसंबंधांसाठी महिन्यात दोन वेळा नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांची भेट घेतली. करोडो गरीब मराठ्यांच्या हक्कांसाठीसुद्धा भेट घ्यावी, अशी विनंती एक समाज घटक म्हणून करतो. भलेही आम्ही गरीब मराठे तुमचे पाव्हणेरावळे नाही आहोत. पण तुमचे प्रेमी आहोत. तुमच्या जवळच्या कारखानदार नातेवाईकांनी तुमची वेळ चांगली नाही म्हणून प्रसंगी घड्याळ काढून बाजूला ठेवलं. हे तुम्ही मागच्या निवडणुकीत पाहिलं आहेच. परंतु आम्ही सामान्य गरीब मराठ्यांनी आपल्याला खूप प्रेम दिले. प्रसंगी भरभरून मतदानही दिलं. आपण पावसात भिजलेले पाहून तर प्रत्येक मराठा तरुण हेलावून गेला होता. आम्ही तुमची कधीच साथ सोडली नाही. याच समाजाने मराठ्यांचे दैवत घराण्यातील उदयनराजेंना सुद्धा मतदान न देता तुमच्यावर विश्वास ठेवला.
तुम्ही तीन भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांची मोट बांधली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी पहाटे स्थापन केलेल्या सरकारला पाडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा दिला. त्या दोघांचं सरकार पाडून तुम्ही तीन पक्षांचं सरकार स्थापन केलं. त्यावेळी आमची आशा पल्लवित झाली होती की तुम्ही आता मराठा समाजाची केससुद्धा अशीच तडफेने लढतील. मराठ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देतील. असे आमच्या भाबड्या मनाला वाटण साहजिक आहे. परंतु अजूनही आम्हाला आरक्षण मिळाले नाही. तुमचे सरकार मधील सहकारी प्रत्येक वेळी चालढकल करत आहेत. केंद्र सरकारवर बोट दाखवत आहेत. आम्हाला हे माहिती आहे की आपले सर्वांसोबत चांगले संबंध आहेत. तुम्ही त्यांचे गुरु स्थानी आहात हेही ऐकलं आहे. मग जरा जोर लावा की.
साहेब आपण मराठ्यांच्या हिश्श्याचं आरक्षण इतर लोकांमध्ये वाटून पार केलं. त्यावेळी मराठा शांत राहिला, कारण तुम्ही आमचे कर्ते पुरुष होता, तुमच्यावर आमचा विश्वास होता. आम्ही कधीही तुमच्यावर संशय घेतला नाही. पण भविष्यात तुम्ही आम्हाला पार उघड्यावर सोडून टाकाल असे वाटलेही नव्हते.
साहेब, तुम्ही राजकारणात सर्व काही मिळवलं. आता समाजासाठी टिकणारे आरक्षण द्या. जग विरोधात जाईल याची भीती बाळगू नका. तुमच्या सतरा पिढ्या तुमच्या कर्तृत्वावर जगतील येवढं मिळवलं. अजुन काय पाहिजे? तुम्ही छगन भुजबळ आणि वडेट्टीवारना विश्वासात घ्या आणि देऊन टाका मराठ्यांना आरक्षण ओबीसीमधून. उद्धव ठाकरेसाहेब विरोध करतील असे वाटत नाही. ती व्यक्ती जशी आहे तशी प्रामाणिक वाटते. भाजप विरोध करेल असे दिसून आल्यास आम्ही सामान्य मराठे बघून घेऊ. एकालाही रस्त्यावर फिरू देणार नाही. पण तुम्ही धाडस करून निर्णय घ्या. आम्ही तुमचे फोटो हातावर नाही तर छातीवर गोंदवून घेऊन फिरू.
तुम्हाला अडचण वाटत असेल अजित पवारांना सांगा. सर्व अधिकार त्यांच्याकडं द्या. त्या बहाद्दराने प्रमोशन मधले बेकायदा आरक्षण संपवून दाखवले. कुणी काहीही वाकड करू शकलं नाही. दोन दिवस टीम टीम केलं आणि ओबीसी नेते शांत झाले. कारण एक वास्तव आहे की सर्वसामान्य ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या विरोधात नाही. त्यांना गाव गाड्यात आमच्यासोबत गुण्या गोविंदाने राहायचे आहे. आता राज्याकडे अधिकार आले आहेत तर निर्णय घ्या. तुम्ही मताची चिंता करू नका. मराठ्यासाठी ओबीसी आयोग नेमा. जातीय जन गणना करा. लगेच कळून जाईल की त्यांनी आमच्या हक्काचं आरक्षण खाल्लंय. आम्ही मागचा हिशोब मागणार नाही. भविष्यात तरी सुखा समाधानाचे जगू द्या. आमच्या पोरा बाळांचे आणखी बळी घेऊ नका. हे पातक तुमच्या वर येऊ नये एवढीच इच्छा.
(योगेश केदार हे मुक्त लेखक आहेत. दिल्लीत १० वर्ष वास्तव्य केल्यामुळे राजकारणाची आवड आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिक समज यामुळे ते लिहिते झाले आहेत.)
संपर्क 9013181308
ट्विटर @yskedar2