अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
ज्यांचं कुणी नसतं त्यांनाही साथ देण्यासाठी पुढे सरसावणं म्हणजेच खरी मानवता. उल्हासनगरमधील तरुणांची मानवता ही संस्था गरजू बेवारस वृद्ध, मनोरुग्ण यांच्यासेवेसाठी सदैव प्रयत्न करते. अशांची सेवा करुन त्यांना पुन्हा माणसांसारखं जगण्याची संधी मिळवून देते.
रस्त्यावर बेवारस पडलेले वृ्द्ध. कशाचंच भान नसलेले मनोरुग्ण. अपघातात जखमी झालेले गरजू. एक नाही अनेक. कितीही संवेदनशील म्हटलं तरी त्यांची अवस्था पाहून आपल्यातील बहुसंख्य मान वळवून पुढे जातात. मात्र, काही माणसं वेगळीही असतात. मानवता ही संस्था अशा वेगळ्या संवेदनशील माणसांचीच. ते कसलीही तमा न बाळगता सेवाकार्यास वाहून घेतात. निराधारांची सेवा करुन त्यांना पुन्हा माणसांसारखं जगण्याची संधी मिळवून देतात.
निलेश बच्छाव, मयुर कदम, बाळु राणे आणि अनुराग चव्हाण हे चार तरुण त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह मानवताचं कार्य अविरत सुरु राखतात. त्यांच्या सत्कार्यामुळे आता समाजातील इतरही अनेक संवेदनशील माणसं साथ देतात.
त्यांनी आजवर अथक, सतत केलेल्या कार्याची माहिती त्यांच्याच शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न…
माणूस मनोरुग्ण कधीच नसतो, त्याला त्याच्या आजुबाजुची परिस्थिती मनोरुग्ण बनवते. काही वर्ष एक महिला रस्त्यावर राहत होती. हळूहळू तिची मानसिक स्थिती बिघडत गेली. ‘मानवता’ने या संस्थेने त्यांच्यावर उपाचार करण्यासाठी प्रयत्न केले पण ती महिला ऐकत नव्हती. त्यांनी शेवटी उपचारासाठी श्रद्धा फाऊंडेशनमध्ये दाखल केले. या महिलेचे उपचार पूर्ण झाल्यावर तिच्या घरचा शोध घेऊन गावी परभणीमध्ये घरच्यांजवळ पाठवण्यात आले.
मानवता संस्था ही कार्यक्रमात उरलेले जेवण गेले ४ वर्ष घेऊन गरजूंपर्यंत पोहचवते आहे. मधल्या काळात कामाचा व्याप वाढल्यामुळे त्यांना जेवण गरजुंपर्यंत पोहोचवणे शक्य नव्हत. मात्र त्यांनी पुन्हा ते सुरु केले आहे. कुणी तरी ते अन्न फेकुन देण्यापेक्षा ते कुणा उपाशी असलेल्या गरजूपर्यंत पोहचवणे या सारखे समाधान आयुष्यात रोज आले पाहिजे याच उद्देशाने ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेवण पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
रसत्यावर असलेली बेवारस एक स्त्री वय अंदाजे ३५-४० दरम्यान असेल, रात्री बेरात्री रसत्यावर फिरत असे. मिळेल ते खात, मनोरुग्ण असलेल्या या महिलेला उपचारासाठी कर्जतला श्रद्धा फाऊंडेशनमध्ये ॲडमिट करण्यात आले. तिच्या एचआयव्ही आणि यूरिन चाचणी निगेटीव्ह आल्या आहेत.
भिक मागता मागता दिवस ढकलत एक काका कसेबसे जगत होते. पायाच्या जखमेमुळे त्यांना चालणे त्रासदायक झाले होते. भान न राहिल्याने ते अस्वच्छ राहू लागले. त्यांच्या शरीराला दुर्गंधी येत असल्याने त्या काकांबद्दल तक्रार आली. तिकडे जाऊन त्यांना उचलून, एका स्वच्छ जागेवर आणून, दाढी-केस कापणे, अंग घासून त्यांना तयार करुन रुग्णालयात रात्री ३ वाजता ॲडमिट केले. सकाळी त्यांच्यावर उपचार केले. साखर असल्यामुळे विशिष्ट काळजी घेणे, जेवण देण्यात येत आहे.
मानवतेच्या कार्यकर्त्यांना एकदा एक फोन आला होता की एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत एकाच जागी पडून आहे. तिकडे गेल्यावर समजले की ती व्यक्ती कायम बाहेरच फिरत असते आणि रस्त्याच्या बाजूला झोपते. गेले काही दिवस अशक्तपणामुळे एकाच जागी पडून आहे. मानवता संस्था तिथे गेल्यावर त्यांनी या व्यक्तीला ग्लुकोजचे पाणी पाजले, तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणले. पण एकाच जागी पडून असल्यामुळे शरीर पूर्ण घाण झाले होते. त्याचे केस दाढी कापून गरम पाण्याने आंघोळ घालून चांगले कपडे घातले. पण त्यांना काही शारीरिक आजार नसल्यामुळे रुग्णालयात घेऊन जाण्यात काही अर्थ नव्हता. आणि ते आश्रमामध्ये यायला तयार नव्हते. म्हणून ते पुन्हा रस्त्यावर वरच राहिले. अर्थात बदललेल्या अवस्थेत.
उल्हासनगरमध्ये गोल मैदान जवळच्या बस स्टॉप जवळ एक काका बेवारस स्थितीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पडून होते. तिकडे गेल्यावर त्यांना पाणी आणि ORS पाजत त्यांच्या घराबद्दल चौकशी केली. नातेवाईकांची माहिती मिळाली. त्यांना आंघोळ घालून चांगले कपडे घालून तात्पुरत्या आश्रयासाठी त्यांना आश्रममध्ये ठेवण्यात आले. या काकांच्या घरासाठी मानवता या संस्थेने आपल्या फेसबुक पोस्टवर त्यांची पोस्ट टाकली होती आणि फेसबुक चा माध्यमातून २ दिवसातच त्यांचे घर मिळाले. त्यांना घरी पोहचवण्यात आले.
रस्त्यावरच्या लोकांसाठी सेवाकार्य करताना वैद्यकीय सेवेची आवश्यकता भासत असत. त्यातूनच मानवता संस्थेसाठी आपलं हक्काचे स्वत:चे जनाई रुग्णालय सुरु करण्यात आले. सामान्य जनतेसाठी सुद्धा २४ तास चालू असे हे रुग्णालय आहे. रुग्णांजवळ पैसा नसल्याने खासगी रुग्णालय ज्यांना सेवा नाकारतात, अशांसाठी या रुग्णालयात २४ तासात कधीही उपचारासाठी येऊ शकतात. रस्त्यावरच्या लोकांना रुग्णालयात आणून त्यांच्यावर योग्यरीत्या उपचार केले जातात. रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये असलेल्या जनाई रुग्णालयात डॉ. संतोष सदावर्ते, सोनाली कदम हे व्यवस्था पाहतात. तेथे सेवा पॅथोलॉजी लॅबही आहे.
उल्हासनगर 2 मध्ये एक काका बेवारस स्थितीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पडून होते.तिकडे गेल्यावर घराबद्दल चौकशी केली असता ते काका देवगड तालुक्यातील महाळुंगे या गावचे व त्यांचे नाव सुयश राणे आहे.
कोणी ओळखत असल्यास कृपया कळवावे
Ramchandra Rane -९६९९४४१२७६
निलेश बच्छाव-८१०८५५०२३६ pic.twitter.com/5kqUG4Zi4V— harshu🐼 (@nav_me22) March 27, 2022
ही काही उदाहरणे फक्त या वर्षाच्या गेल्या तीन महिन्यांमधील सेवाकार्यातील आहे. या निवडक कार्यांपेक्षाही कित्येक पट जास्त काम या संस्थेने केली आहे. ही संस्था करत असते.
जर तुमच्या पण नजरेत असे रस्त्यावरील बेवारस मनोरुग्ण असतील तर नक्की फोन करा. त्यांना बरं करुन त्यांचे राहते घर शोधण्याचा प्रयत्न मानवता संस्था नक्कीच करेल.
निलेश बच्छाव-8108560236
मयुर कदम-8483867843
बाळु राणे-9699441276
अनुराग चव्हाण- +918788244574
पाहा व्हिडीओ: