मुक्तपीठ टीम
तलवार घेऊन आलेल्या एका हल्लेखोराने मंगळवारी चेन्नईतील सत्यम टीव्ही या लोकप्रिय सॅटेलाईट वृत्तवाहिनीच्या मुख्यालयात प्रवेश केला आणि तोडफोड केली. वाहिनीने सादर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तलवार आणि ढाल घेऊन एक हल्लेखोर तेथील मालमत्तेची तोडफोड करताना दिसत आहे.
चॅनेलचे व्यवस्थापकीय संचालक आयझॅक लिव्हिंगस्टोन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “हल्लेखोर कार पार्किंग क्षेत्रातून ऑफिस कॅम्पसमध्ये दाखल झाला. त्याने गिटार बॅगमध्ये शस्त्रे ठेवली होती.”
लिव्हिंगस्टोन यांनी दावा केला की ते त्या हल्लेखोराचे लक्ष्य होते. तो सतत त्यांच्याबद्दल विचारत होता. लिव्हिंगस्टोन यांनी हल्ल्यामागील संभाव्य कारण किंवा हेतू काय आहे हे विचारले असता ते म्हणाले,”यामागे काय कारण आहे ते आम्हाला माहित नाही.”
चेन्नईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणावरील प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, रोयापुरम पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीचे नाव राजेश कुमार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लिव्हिंगस्टोनने दावा केला की, “आरोपी राजेश मूळचा कोयंबटूरचा रहिवाशी आहे. पण तो गुजरातला पळून गेला होता. तो गाडी चालवत फिरत होता.”