मुक्तपीठ टीम
ही घटना आहे थक्क करणारी… वांगणी रेल्वे स्थानकात घडलेली ही घटना हृदयलास्पर्श करणारी होती. देवदूतासारखा धावून आलेला मयुर शेळके याला मुक्तपीठ टीमचा सलाम.
वांगणी रेल्वेस्थानकात १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताना एक अंध महिला तिच्या मुलासोबत प्लॅटफॉर्मवरून जात होती, तेवढ्यात मुलगा त्याच्या आईच्या हातातून सुटून ट्रॅकवर पडला पण तिला दिसत नसल्याने ती मदतीसाठी ओरडू लागली तेवढ्यात ट्रेनचा आवाज येऊ लागल्याने ती घाबरली आणि जीवाच्या आकांताने मुलाला वाचवण्यासाठी ओरडू लागली. त्याचवेळी विरुद्ध बाजुच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या वागंणी स्टेशनवरील पॉईंटमन मयुर शेळके यांनी सर्व प्रकार पाहिला आणि त्याने ट्रॅकवर झेप घेतली. त्या मुलाचा जीव मयुरने वाचवला.
याबद्दलची माहिती सर्वत्र पसरताच रेल्वेमंत्री पियुष गोयल याबाबत ट्विट करत म्हणाले की, “मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकातील रेल्वे कर्मचारी मयुर शेळके याचा फार अभिमान आहे ज्याने अपवादात्मक धैर्यपूर्ण कृत्य केले. स्वत: चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचविला.” तर, धनंजय मुंडे यांनी देखील मयुर शेळकेचं कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “अंध मातेच्या मदतीला देवदूताप्रमाणे धावून आलेल्या या युवकाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. या जगात जीवावर उदार होऊन लोकांची मदत करण्याची भावना शिल्लक आहे, हेच हा व्हीडिओ पाहून कळतं! मित्रा, हॅट्स ऑफ तुझ्या शौर्याला.”
स्वत:च्या जीवाची कसलीच पर्वा न करता मयुर शेळकेने त्या मुलाचे प्राण वाचवले. आज कुठे ना कुठे तरी माणुसकी शिल्लक आहे हे बातमीतून समोर येत आहे. मयुरच्या धाडसीपणा असलेल्या या वृत्तीमुळे या चिमुरड्याचे प्राण वाचले. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत मयुरचे भरभरून कौतुक केले जात आहे.