मुक्तपीठ टीम
मुंबईत काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आठ जण गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिक सुद्धा घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत.
कशी घडली घटना?
- मुंबई मनपाने दिलेल्या माहितीनुसार, मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
- ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला शेजारी असलेल्या दोन मजली घरांवर पडला.
- इमारतीवर इमारत कोसळल्यानं परिसरात मोठी खळबळ माजली होती.
बचावकार्य सुरु
- या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई मनपासह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे.
- मोठ्या वेगाने घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
- या दुर्घटनेत काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
- अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १७ जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढलं आहे.
- मात्र अद्याप अजून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
- दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.