मुक्तपीठ टीम
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत एकूण ११ लोकांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपीन रावतही पत्नीसह प्रवास करत होते. अपघात होताच हेलिकॉप्टरने पेट घेतला. ज्या झाडांवर हेलिकॉप्टर कोसळलं ती झाडंही कापली गेली झाडांनीही पेट घेतली. आपल्या देशातील हेलिकॉप्टर अपघाताची ही पहिलीच घटना नाही. भारतात आजवर हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले आहेत. हे अपघात एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून लष्करी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांचं जीवन संपवणारे ठरले आहेत.
आजवरचे हेलिकॉप्टर अपघात…
- ११ ऑगस्ट २००३ मध्ये ओएनजीसीचे हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला तर २४ जण बेपत्ता झाले आहेत. हे सर्वजण ओएनजीसीचे कर्मचारी होते.
- २ सप्टेंबर २००९ मध्ये राज्य सरकारचे बेल ४३० हेलिकॉप्टर कुरनूल, आंध्र प्रदेश येथे कोसळले, त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते वायएस राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू झाला.
- ३० ऑगस्ट २०१२ मध्ये गुजरातमधील जामनगरजवळ भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. या अपघातात हवाई दलाच्या ९ जवानांचा मृत्यू झाला.
- २०१६ मध्ये सुकना मिलिटरी स्टेशनवर चिताह हेलिकॉप्टर अपघातात लष्कराने आपले तीन अधिकारी गमावले.
- अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ येथे ६ ऑक्टोबर २०१७ मध्ये शुक्रवारी सकाळी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये हवाई दलाच्या (IAF) ५ क्रू मेंबर्स व्यतिरिक्त भारतीय सेनेच्या दोन सदस्यांचाही समावेश आहे. IAF चे Mi-17 V5 हेलिकॉप्टर सकाळी ६ च्या सुमारास कोसळले. त्यावेळी हेलिकॉप्टर एअर मेंटेनन्स मिशनवर होते.
- २७ जून २०१८ मध्ये नाशिक येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लष्कराचं लढाऊ विमान कोसळलं असून या दुर्घटनेत संपूर्ण विमान जळून खाक झालं. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
- मे २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमधील नाथा टॉप येथे चिताह हेलिकॉप्टर उतरताना अपघात झाला.
- आसाममधील माजुली जिल्ह्यात २०१८ मध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय हवाई दलाच्या मायक्रोलाइट एअरक्रॉफ्टच्या हेलिकॉप्टरने नेहमीच्या सरावासाठी जोरहट एअरफोर्स स्टेशनवरून उड्डाण केलं. त्याच उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टर माजुली नदी किनारी दुर्घटनाग्रस्त झालं.
- २०१९ मध्ये भूतानमध्ये भारतीय लष्काराचं चिताह हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत २ पायलट शहीद झाले. खेंतोन्गमानी, योन्फुला, त्राशीगंगाजवळच्या टेकडीवर हा अपघात झाला असून जंगलग्रस्त भागात हेलिकॉप्टर कोसळल्याने बचावकार्यास अडथळा आला. अपघात झालेला एक पायलट हा भारतीय लष्काराचा पायलट लेफ्टनंट कर्नल रँकचा होता तर दुसरा भूतानी सैन्याचा पायलट होता.
- २०१९ मध्ये चेतक हेलिकॉप्टरचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला. हे हेलिकॉप्टर समुद्रात पडले होते.
दोन वर्षातील हेलिकॉप्टर अपघात…
- फेब्रुवारी २०२० मध्ये जम्मूच्या रियासी भागात लँडिंग करताना आर्मीचे चित्ताह हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
- २५ जानेवारी २०२१ मध्ये जम्मू काश्मीर कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात भारतीय लष्कराचे ध्रुव ALH हे हेलिकॉप्टर क्रश झाले. या दुर्घटनेत लष्कराचे दोन जवार गंभीर झाले.
- उधमपूरमध्ये पटनीटॉप भागातील जंगलात २१ सप्टेंबर २०२१ लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि को-पायलट हे दोन जण होते. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर गावकऱ्यांनी दोघांना बाहेर काढलं. यावेळी दोन्ही पायलट गंभीर जखमी होते. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. पण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
- १८ नोव्हेंबर २०२१ मध्ये IAF चे Mi 17 हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशच्या पूर्व सेक्टरमध्ये कोसळले, परंतु २ पायलट आणि ३ क्रू सदस्य या अपघातातून बचावले.
हे ही वाचा:
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं! चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत त्याच हेलिकॉप्टरने प्रवासात!!
सीडीएस बिपीन रावत यांचा अपघात झाला ते Mi-17V5 हेलिकॉप्टर आहे तरी कसं?
यापूर्वीही झाला होता सीडीएस बिपिन रावतांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात…