मुक्तपीठ टीम
जंगलातील नैसर्गिक साधनसंपत्तीला राख करणाऱ्या आगींची समस्या मनालाही चटके देणारी. राज्यातील शेकडो जंगलांमध्ये नेहमीच आगी लागतात. किंवा काही अपप्रवृत्ती लावतातही. जंगलातील निसर्ग वैभवाला खाक होताना पाहून सारेच हळहळत असतात. पण क्वचितच कोणी काही करते. पालघरचे चित्रकार शिक्षक महेश काचरेही या आगींमुळे व्यथित होत असत. पण शांत न बसता त्यांनी आपल्या भावाच्या सहकार्याने आगी विझवण्याचे आणि ते प्रचारित करण्याचे काम सुरु केले. आज त्यांच्या प्रयत्नांमधून शेकडो निसर्ग मित्र तयार झाले आहेत. हे निसर्ग मित्र आपापल्या भागातील जंगलांना लागलेल्या आगी विझवण्याचा प्रयत्न करतात.
पालघरचे महेश काचरे व त्यांचा भाऊ भावेश काचरे यांनी स्वतः जंगलांमध्ये जावून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांना अनेक ठिकाणी झाडे, प्राणी, पक्षी, त्यांचा निवारा असणारी निसर्गसंपदा वाचविण्यात यश आले. पण ते एकटे संपूर्ण महाराष्ट्रातील जंगलांच्या आगी दररोज विझवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले. त्यासाठी एक वेगळा मार्ग निवडला. त्यांच्या मित्रांनी आग विझवतानाचे फोटो आणि व्हिडीओ काही ठिकाणी घेतले होते. ते त्यांच्याकडून घेवून जनजागृतीपर संदेशांसह ती मोबाईलद्वारे व्हायरल केले. त्याचा प्रतिसाद आता दिसू लागला आहे. जंगल रक्षणाचे महेश काचरेंचे काम पाहणारे आपापल्या परिसरातील डोंगरावरील आगी विझवण्यासाठी प्रयत्न करु लागले आहेत. काही ठिकाणी आग विझवण्यासाठी टिम सुध्दा तयार झाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ: