Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महर्षी कर्वे…१०६ वर्षांपूर्वी महिलांसाठी विद्यापीठ स्थापन करणारा द्रष्टा माणूस!

September 6, 2026
in प्रेरणा
0
Pro. Hari Narke

प्रा.हरी नरके

महर्षी धोंडो केशव कर्वे एक फार मोठा भला माणूस. अतिशय द्रष्टा. प्रांजळ. आजच्याच दिवशी ३ व ४ जूनला १९१६ मध्ये त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली. १८ एप्रिल १८५८ चा त्यांचा जन्म. ते १०४ वर्षे जगले. २९ आक्टोबर १९५८ रोजी त्यांचा भारत रत्न देऊन सन्मान करण्यात आला. मात्र पुरस्कार घ्यायला कर्वे दिल्लीला वेळेत पोचू शकले नाहीत. कारण हिंगण्याच्या तलाठ्यानं गृहचौकशी अहवालात राष्ट्रपती भवनला कळवलेलं होतं, महर्षी कर्वे नावाचा इसम या गावात आढळून आला नाही. पुढे त्याची विभागीय चौकशी झाली तेव्हा त्यानं सरकारी उत्तर दिलं, मला श्री धोंडो केशव कर्वे माहित होते, महर्षी कर्वे हा इसम कोण ते मला माहित नव्हतं. माझ्या दप्तरात तशी नोंद नव्हती.

कर्व्यांनी शतकापुर्वी विधवांसाठी होस्टेल काढणं, महिला विद्यालय व त्यानंतर महिला विद्यापीठाची स्थापना करणं, स्वत: एका विधवेशी लग्न करणं ही सारीच क्रांतिकारक पावलं. बोटी बंद होत्या म्हणून ते कोकणातून (मुरूड)मुंबईला शिकायला चालत गेले. केव्हढी ही ज्ञाननिष्ठा. गावानं त्यांना तालुक्याचं भूषण म्हणून गौरवलेलं असताना कर्व्यांनी एका विधवेशी लग्न केलं म्हणून ब्राह्मण जातीनं त्यांना “जिल्हादूषण” म्हणून वाळीत टाकलं.

कर्व्यांच्या पुनर्विवाहाने नाराज झालेल्या नाशिकच्या गंगालहरी या वर्तमानपत्राने लिहिले, “कर्वे हा खर्‍या ब्राह्मण बीजाचा बच्चा नसणार.” जातीबंधने व पुर्वापार चाली पाळूनच अशी लग्ने व्हावीत असे कर्वे मानत असत.सं. शारदा हे नाटक लिहुन ज्यांनी मराठी रंगभुमीवर सुधारणवादी विचार मांडला त्या देवलांनी कर्व्यांच्या संस्थेला देणगी दिली. त्यातून बांधण्यात आलेल्या मंदिरात ‘हिंदू अस्पृश्यांना’ या मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असे लिहिलेला बोर्ड लावलेला होता. कारण तशी देणगीदार यांची अट होती. कर्वे यांचे तसे मत नसावे,पण देणगीदारापुढे ते हतबल असावेत.

“पण लक्षात कोण घेतो?” ही विधवांबद्दलची बंडखोर कादंबरी लिहिणार्‍या खुद्द ह.ना.आपटे यांचा महिला विद्यापीठाला मात्र विरोध होता. मुंबईत शिकवण्या करून राहताना कर्व्यांच्या वाट्याला खूप गरिबी आलेली होती. त्याही गरिबीत ते समाजाला विसरले नाहीत. फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झाल्यावर त्यांनी पुण्यात ब्राह्मण विधवांसाठी आश्रम काढला. त्यासाठी निधी जमवण्याकरिता ते देशभर फिरले. अनेकदा अपमान सोसले. जननिंदा तर कायमचीच पदरात पडायची.

मुर्ती छोटी पण धीराची. जिद्दीची.

ज्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं त्यांच्याच विधवा लेकीबाळींच्या भल्यासाठी काम करणं ही साधी गोष्ट नाही.

त्यांनी १९१५ साली आपले आत्मवृत्त लिहिले. १९२८ साली त्याला पुरवणी जोडून त्याची सुधारित आवृत्ती काढली. १९५८ मध्ये त्यांच्या शतकमहोत्सवानिमित्त १९२८ ते १९५८ च्या नोंदीच्या आधारे पटवर्धनांनी त्यांचे मोठे चरित्र लिहिले. ते वाचताना गलबलायला होते.एखाद्यानं समाजासाठी किती सोसावं?

३ व ४ जून १९१६ ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली.

वयाच्या सत्तरीत त्यांनी निराश होऊन लिहिलं, “भारतीय स्त्रीयांच्या उच्च शिक्षणाला हजारो वर्षे जावी लागतील.”

आज स्त्रियांनी उच्च शिक्षणात घेतलेली आघाडी बघून कदाचित आपला अंदाज चुकला याची त्यांनी प्रांजळ कबुली दिली असती.

कर्वे बुद्धीने बेताचे होते असे प्रस्तावनाकारांनी, (रॅंग्लर परांजपे) यांनी लिहून ठेवलंय. एव्हढा त्याग करणारा बंडखोर माणूस बुद्धीने बेताचा असेल असं मला वाटत नाही. कर्वे यांच्या तीक्ष्ण बुद्धीचंच हे द्रष्टे काम.परांजपे यांच्या मताशी मी सहमत नाही.

मुलींना उच्च शिक्षण का द्यायचं यामागचं कर्व्यांचं म्हणणं असं, “बायकांना प्रपंच चांगला करता यायला हवा. प्रत्येक बाईला किमान ५ माणसांचा स्वयंपाक कोणाच्याही मदतीशिवाय करता यायला हवा. त्याशिवाय तिला पदवी मिळता कामा नये. गृहीणीची कर्तव्ये व जबाबदार्‍या यांचे शिक्षण पदवीला दिलेच पाहिजे. स्वच्छता, आरोग्य, नीटनेटकेपणा बाईला अत्यावश्यक.”

या कामाला लोकमान्य टिळकांचा पाठींबा मिळावा म्हणून कर्वे त्यांना भेटले. “स्त्रीयांना उच्च शिक्षण देता कामा नये ” अशी भुमिका टिळकांनी घेतली. ते म्हणाले, “उच्च शिक्षणामुळे स्त्रिया संशयवादी बनतील व आपले गृहसौख्य लयाला जाईल.”

शिक्षणखात्यातले एक उच्च अधिकारी तर म्हणाले, “उच्च शिक्षणामुळे स्त्रीया स्वैराचारी बनतील आणि वाट्टेल तसले बूट आणि कपडे घालून नाचरेपणा करायला लागतील.”

१९२७ साली अखिल भारतवर्षीय स्त्रीयांची पहिली शैक्षणिक परिषद झाली. तिने ठराव केला, “बायकांना मातृत्वाचा आदर्श आणि घर सुंदर, आकर्षक व स्वच्छ कसे ठेवावे याचे उच्च शिक्षण दिले जावे.”

मुंबई विद्यापीठात स्थापनेपासून वकिलीची, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत होती. १८७१ पासून विद्यापीठाने मराठी शिकायला बंदी घातली.

कर्वे म्हणतात, ” मराठी माणूस हा भांडखोर असणार हे ठरलेलेच आहे. त्याने मराठी भाषेची साथ सोडल्यानेच त्याच्या शिक्षणाचे नुकसान झालेले आहे.”

कर्वे एम.ए. ला गणितात नापास झाले होते. आपण फार भित्रे आणि लाजाळू होतो असेही कर्वे म्हणतात.

त्यांचे वयाच्या १५ व्या वर्षी लग्न झाले तेव्हा त्यांच्या बायकोचे वय ९ वर्षे होते. ती एका मुलाला, रघुनाथाला जन्म देऊन अकाली गेली.

कर्व्यांच्या आईची चार मुले जन्मत:च गेली म्हणून पुढे त्यांच्या आईने एका मुलाचे नाव भिकू ठेवले व कर्व्यांचे नाव धोंडा ठेवले. (अशी नावे शूद्रांमध्येच ठेवली जात.)

कर्व्यांनी गावी शाळा काढली तेव्हा त्या शाळेत ब्राह्मणेतरांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

कर्व्यांच्या हिंगण्याच्या आश्रमात महर्षी वि.रा. शिंदे यांच्या विधवा बहिणीला प्रवेश दिला गेला नाही. कारण संस्थेचा नियम होता फक्त “ब्राह्मण विधवांनाच प्रवेश मिळेल.” हेही कर्वे यांना देणगीदार यांच्या सूचनेवरून करावे लागले असावे.

पुढे महिला विद्यापीठात मात्र तो शिथिल करण्यात आल्याने पहिल्या २५ वर्षात तिथे शिकलेल्या २०२ मुलींपैकी १ धनगर, १ तेली, ४ वाणी, ११ मराठा व १८४ ब्राह्मण होत्या. या विद्यापीठात मोठी देणगी देण्याची आशा दाखवून ठाकरसी मंडळींनी कर्वे यांना विद्यापीठास सर नाथीबाई दामोदर ठाकरसी यांचे नाव द्यायला लावले खरे पण ही देणगी विद्यापीठाला कधीही मिळालीच नाही. कर्वे यांची या बाबतीत हातोहात फसवणूक करण्यात आली होती हे प्रा. विलास खोले यांनी पुराव्यानिशी कर्वे यांच्यावरील आपल्या ग्रंथात दाखवून दिले आहे. खरे तर या विद्यापीठाला कर्वे यांचे नाव दिले जायचे हवे.

“ब्राह्मणांनी बेटीव्यवहार हा फक्त ब्राह्मणातच करावा, पंक्तीव्यवहारात पुर्वपरंपरा पाळावी” असेही कर्वे सांगतात.

“अस्पृश्य जर स्वच्छ, संभावित आणि रितीभाती पाळणारा असेल तर त्याच्यासोबत भोजन करायला मात्र आपली हरकत नाही” असेही कर्वे म्हणतात. प्रत्येक माणूस काळाचा कैदी असतो. कर्वे पुरोगामी होते याचा अर्थ सर्वच बाबतीत त्यांनी क्रांतिकारक असायला हवे होते ही अपेक्षा योग्य नाही असे मला वाटते. ते कोणालाच शक्य नसते. कर्वे महापुरुष असले तरी त्यांनाही काळाची मर्यादा होतीच.

स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सर्व भारतीयांचा कर्वे आवर्जून ऋणनिर्देश करतात मात्र ते चुकूनही महात्मा फुल्यांचा अथवा सावित्रीबाईंचा उल्लेख करीत नाहीत याचा खेद होतो.

या पुस्तकात फुले, शाहू, बाबासाहेब यांच्या नावाला जागाच नाही याने मन खंतावते. पण तरीही हे पुस्तक महत्वाचे आहे.

कर्वे यांच्या महिला विद्यापीठात शिकवणारे आणि महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिणारे पहिले लेखक म्हणजे प्रा. गं.बा. सरदार होत. त्यांनी आपले हे पुस्तक कर्व्यांना सप्रेम भेट दिलेले होते.

ते मला २५ वर्षांपुर्वी पुण्याच्या आप्पा बळवंत चौकातील रद्दीच्या दुकानात मिळाले. ते आजही माझ्याकडे सुरक्षित आहे.

महर्षी कर्व्यांच्या कामाला काही व्यक्तीगत आणि काही काळाच्या मर्यादा असतीलही पण त्यांनी स्त्रीशिक्षण आणि स्त्री-पुरूष समतेच्या वाटा सुकर केल्या हे विसरता कामा नये. हा माणूस मोठाच होता. १०६ वर्षांपुर्वी महिला विद्यापीठाची पुण्यात पायाभरणी करणार्‍या महर्षि कर्व्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.

 

See the source image

(प्रा. हरी नरके हे ५४ पुस्तकांचे लेखक-संपादक. वक्ते, संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक प्राध्यापक आणि विभागप्रमुख – महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे [निवृत्त] आहेत.)


Tags: Maharashree Karvepreranapro. hari narakeSNDTएसएनडीटीप्रा. हरी नरकेप्रेरणामहर्षी कर्वेमहिला विद्यापीठ
Previous Post

आयडीबीआय बँकेत १ हजार ५४४ जागांवर करिअर संधी

Next Post

भारत आणि इंडिया वेगळा आहे…

Next Post
Pravin Gaikwad

भारत आणि इंडिया वेगळा आहे…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!