मध्य प्रदेशातील इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही एसटी बस पूलाचा कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १५ जणांना वाचवण्यात आलं आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचावकार्य व्यवस्थित पार पाडावं व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश दिले आहेत. यादरम्यान त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
कसा घडला बसचा अपघात?
- अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची (MH40 N9848) होती.
- सकाळी ७ च्या सुमारास इंदूरवरुन जळगावकडे जात होती.
- इंदूरमध्ये १२ प्रवासी चढले.
- नर्मदा नदीवरील पूलवरुन खाली कोसळली.
- आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
- या बसमध्ये ५० ते ५५ प्रवासी होते, अशी माहिती आहे.
- मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे.
- प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मृत्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत देण्याचे निर्देश!!
- अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचावकार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
- अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेशमधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
- शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनादेखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
- तसेच त्यांनी ट्वीट करत, मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये बस बुडून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश दिले आहेत.
घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असून बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळी मदतीसाठी ०९५५५८९९०१, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष ०२५७- २२२३१८०, ०२५७- २२२३१८० हे क्रमांक जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिद्ध केले आहेत, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून दुपारी दोनच्या सुमारास मिळाली आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. एसटी महामंडळाकडून दुपारी दीड वाजता सदर माहिती देण्यात आली आहे.