मुक्तपीठ टीम
दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी गेल्या शनिवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित माहिती दिली आहे.
दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसार
- दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे.
- त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे.
- तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल .
- अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे.
पेपर लिहिण्यासाठी अधिक वेळ
- यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे.
- ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
- ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अतिरिक्त वेळ तर ७० गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.
- दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावं लागणार आहे.
- तसंच १० मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.
ऑफलाईन परीक्षेसाठीची नियमावली
- परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.
- कोरोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल.
- जर एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणं दिसली तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल.
- तसंच जवळच्या आरोग्य केंद्रामार्फेत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल.
- परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परिक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल.
- जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षाही दोन वेळेस देण्याची संधी असेल.
- परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचं बंधन नसेल.
- मात्र, पालकांनी पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे.
- राज्यात दहावी आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्याचे लसीकरण झाल्याची माहिती आहे.
- परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त २५ विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील.
- विद्यार्थ्याच्या जवळचे परीक्षा केंद्र देण्याची सोय करण्यात येईल.
- शाळेत अधिक विद्यार्थ्यी असल्याचं त्याच शाळेत परीक्षा केंद्र करण्यात येईल.