प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच आकर्षक ठरला आहे. सन १९७१ ते २०१९ या ४८ वर्षाच्या काळात महाराष्ट्राने ३६ वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे. १२ वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारही पटकाविला आहे. यंदा ‘ वारकरी संत परंपरेवर ’ आधारित चित्ररथ सादर होत आहे.
महाराष्ट्राने सन १९७१ मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी १९७३ साली ‘ भारत छोडो आंदोलन ’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते.
राज्य निर्मितीपासून अवघ्या १४ वर्षात राज्यांमध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापित झाले १९७४ च्या चित्ररथामध्ये याच उद्योगधंदयाचे प्रतिबिंब राजपथावर दिसले. पुढ १९७८ मध्ये ‘विविधतेत समानता’ असा चित्ररथ राजपथावर झळकला. तर वर्ष १९७९ मध्ये ‘बाल विकास ’ या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून बालविकासाचे धोरण दर्शविले.
महाराष्ट्रामधील भौगोलिक भागानुरूप विविध सण साजरे केले जातात, असाच विषय धरून १९८० ‘ महाराष्ट्रातील सण’ असा चित्ररथ साकारण्यात आला. वर्ष १९८१ आणि अलीकडे २०१८ मध्ये ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ अशा ऐतिहासिक विषयावर चित्ररथ राजपथावर झळकला. दोन्ही वेळी या संकल्पनेच्या चित्ररथाला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले हे विशेष.
सन १९८२ मध्ये राज्यातील समृद्ध ‘लोककला’ विषयावरील चित्ररथाने राजपथावरील प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यात साजरा होणारा ‘बैलपोळा’ हा सण विशेष आहे. याच सणावर वर्ष १९८३ मध्ये आधारित चित्ररथ दर्शविण्यात आला.
लोकमान्य टिळकांवर आधारित विविध विषयांवर ४ वेळा चित्ररथ
भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे भारतीय स्वातंत्र चळवळीत विशेष महत्व आहे. लोकमान्य टिळकांवर आधारित चित्ररथ राजपथावर वेगवेगळया विषयाला धरून उभारण्यात आले. प्रथम सन १९८४ आणि नंतर सन २०१७ मध्ये लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना ‘स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ’ या घोषणेवर आधारीत चित्ररथ उभारण्यात आला. या चित्ररथाला दोनही वेळा व्दितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष १९८८ मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ तर वर्ष १९९३ मध्ये ‘लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ विषयावर चित्ररथ होता. यापैकी १९९३ च्या चित्ररथाने प्रथम पुरस्कार पटकाविला.
वर्ष १९८६ मध्ये स्वातंत्र्य मिळुन चाळीस वर्ष झाली होती, या निमित्ताने ‘स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ असा चित्ररथ राजपथावर सादर करण्यात आला. सन १९९० मध्ये पुन्हा एकदा ‘लोककला’ या विषयावर चित्ररथ राजपथावर दर्शविण्यात आला. वर्ष १९९१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शताब्दी वर्षानिमित्ताने चित्ररथ उभारण्यात आला. ‘वारली तारपा नृत्य ’ असा चित्ररथ सण १९९२ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात दिसला.
‘हापूस’ आंबा’
आंब्यांचा राजा ‘हापूस आंबा’ या संकल्पनेवर सण १९९४ मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. महात्मा गांधीजीच्या १२५ व्या जयंती वर्षामध्ये राज्याने वर्ष १९९६ ला ‘बापु स्मृती’ असा चित्ररथ दर्शविण्यात आला. वर्ष १९९७ ला चित्रपट सृष्टीने शंभरी पूर्ण केली होती. याची आठवण म्हणुन ‘चित्रपट सृष्टीचे शंभर वर्ष ’ अशा संकल्पनेवर चित्ररथ साकारण्यात आला.
वर्ष १९९६ मध्ये ‘महिला बालविकास’ अशा महत्वपुर्ण विषयावर चित्ररथ तयार करण्यात आला. वर्ष १९९९ ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी’ दर्शविणार चित्ररथ राजपथावर झळकला. राज्याची ओळख ठळकपणे दर्शविणारे ‘साखर कारखाने’ यावर आधारित २००१ मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. गोकुळ अष्टमीला दही हंडी फोडणारे गोविंदा यांच्यावर ‘गोविंदा आला’ अशी संकल्पना घेऊन २००२ ला चित्ररथ दर्शविण्यात आला. सण २००३ मध्ये ‘आदिवासी वारली चित्रकला’ असा आदिवासी जीवनावर आधारित चित्ररथ आकारण्यात आला.
‘मुंबईचा डबेवाला’
महाराष्ट्राचा स्थापत्य ठेवा असलेल्या अंजता लेणी यावर आधारित सण २००४ ला अजंता लेणींमधील काही लेणींची भित्तीचित्रे चित्ररथात दर्शविण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘ग्रामस्वच्छता अभियान’ योजनेवर आधारीत चित्ररथ सण २००६ मध्ये साकारण्यात आला. राज्याची महत्त्वाची धार्मिक जत्रा ‘जेजुरीचा खंडेराया’ या संकल्पनेचा चित्ररथ वर्ष २००७ मध्ये चित्ररथ दर्शविण्यात आला. पुढे २००९ ला ‘धनगर’ असा विषय घेऊन चित्ररथ उभारण्यात आला. वर्ष २०१० ला जगाचे लक्ष वेधणारा ‘मुंबईचा डबेवाला’ या संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्यात आला.
‘पंढरीची वारी’
महाराष्ट्राचे नृत्य ‘लावणी ’ यावर चित्ररथ २०११ मध्ये दर्शविण्यात आला, या चित्ररथाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. वर्ष २०१२ मध्ये वेरूळ लेणीमधील ‘कैलास मंदीर’ या विषयावरील चित्ररथ उभारण्यात आला होता. सण २०१४ मध्ये कोकणातील मच्छीमारी समुहातील असणारा महत्वपुर्ण सण ‘नारळी पोर्णिमा’ या विषयावर चित्ररथ साकाराण्यात आला. वर्ष २०१५ मध्ये राज्याची शतकांची परंपरा ‘पंढरीची वारी’ या वारीच्या विषयावर आधारित चित्ररथाने राजपथावर भक्तीमय वातावरण निर्माण केले. सण २०१९ महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘भारत छोडो’ आंदोलनवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला.
आतापर्यंत महाराष्ट्राच्या १२ चित्ररथांना विविध पुरस्कार
महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक-सामाजिक, पर्यटन आदि विषयांवर चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली आहे. यात राज्याने १२ वेळा पुरस्कार पटकावले आहे. वर्ष १९९३ ते १९९५ पर्यंत सलग तीन वेळा प्रथम पुरस्कार पटकावुन विक्रम निर्माण केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला ७ वेळा प्रथम पुरस्कार मिळालेले आहेत. तीन वेळा द्वितीय पुरस्कार व दोन वेळा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.
वर्ष १९८१ आणि २०१८ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका’वर आधारित चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रात पोळा या सणाला विशेष महत्व आहे बैलपोळा मोठया उत्साहात साजरा केला जातो याच विषयावर आधारित वर्ष १९८३ च्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार देण्यात आले होते. वर्ष १९९३ मध्ये ‘लोकमान्य टिळाकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ या चित्ररथालाही वर्ष १९९४ ला फळाचा राजा ‘हापूस आंबा’ या चित्ररथाला आणि वर्ष १९९५ मध्ये ‘बापू स्मृती’ या चित्ररथाला असे सलग तीनदा प्रथम पुरस्कार मिळाला. ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाला वर्ष २०१५ मध्ये प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्राने स्वातंत्र्य संग्रामात कशा प्रकारे भाग घेतले होते यावर आधारित वर्ष १९८६ च्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले होते. वर्षे १९८८ मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले वर्ष २००९ मध्ये राज्यातील ‘धनगर’ समाजाची संस्कृती दर्शविणाऱ्या चित्ररथाने दुसरे पारितोषिक मिळविले. तर वर्ष २००७ मध्ये ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तिसरे पुरस्कार मिळाले. वर्ष २०१७ मध्ये लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित ‘बाळगंगाधर टिळक’ या चित्ररथाला तीसरा क्रमांक मिळालेला होता.