अंधेरी पश्चिम येथील कोनूर बिल्डर्सने गेटवे प्रकल्पातील एका फ्लॅटचा ताबा खरेदीदाराला वेळेत दिला नाही. त्यामुळे खरेदीदाराने ६० लाखांच्या नुकसानभरपाईसाठी तक्रार केली. तक्रारीनुसार, २०१४ मध्ये सुशांत करकेरा यांनी २ कोटी रुपये किंमतीच्या फ्लॅटची नोंदणी केली होती. बिल्डरने ३१ डिसेंबर २०१६ रोजी किंवा त्यापूर्वी फ्लॅट देणं अपेक्षित होतं. मात्र बिल्डरने कोणतीही माहिती न देता प्रकल्पाच्या कामकाजाची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत वाढविली. तर महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी करताना ती मुदत डिसेंबर २०२० पर्यंत वाढण्यात आली.
एएच कन्स्ट्क्शन, जमीन मालकांच्या काही न टाळता येणाऱ्या अडचणींमुळे प्रकल्पाला उशीर झाल्याचं कॉनूर बिल्डरकडून मांडण्यात आले. महारेराचे सदस्य सिंग यांनी स्पष्ट बजावले की, तक्रारदाराचा जमीन मालक आणि विकासक यांच्यात झालेल्या वादाचा कोणताही संबंध नाही. प्रकल्पाला विलंब होत असल्यास प्रतिवादीने तक्रारदाराला सूचित केले पाहिजे होते. दुरुस्ती करार करून फ्लॅटचा ताबा घेण्याची तारीख बदलली पाहिजे किंवा खरेदीदाराला परतावा द्यायला हवा होता. त्यामुळेच महारेराने बिल्डरने ग्राहकाला ६० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.