मुक्तपीठ टीम
“वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” ही ओळ आपल्या सर्वांनाच सुसंगत आहे. या ओळीचीच जान ठेवत महाराष्ट्राच्या मातीने ते जपलं आहे. महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारसाठी फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने जारी केलेल्या वन सर्वेक्षण अहवाल २०२१ मध्ये एक दिलासादायक बातमी आहे. वृक्षाच्छादनाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रातील सुमारे १२ हजार १०८ चौरस किलोमीटर परिसर वृक्षाच्छादित आहे. यानंतर राजस्थानचे ८ हजार ७३३ चौरस किमी क्षेत्र, मध्य प्रदेशचे ८ हजार ५४ चौरस किमी क्षेत्र आणि कर्नाटकचे ७ हजार ४९७ चौरस किमी क्षेत्र झाडांनी व्यापले आहे.
वनक्षेत्र आणि कार्बनचा साठा दोन्ही वाढले
- वन सर्वेक्षण अहवाल २०२१ नुसार, महाराष्ट्रातील वनक्षेत्रही २० चौरस किमीने वाढले आहे.
- २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात राज्यात एकूण ५० हजार ७७८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे वनक्षेत्र होते.
- हे दोन वर्षांत २०२१ मध्ये ५० हजार ७९८ चौरस किमीपर्यंत वाढले आहे.
- राज्यात २०१७ मध्ये ५० हजार ६८२ चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र होते.
- कार्बन साठ्याच्या बाबतीतही महाराष्ट्राने प्रगती केली आहे.
- २०१९ मध्ये महाराष्ट्रात कार्बन साठा ४ हजार ४०५.०८ टन होता, जो दोन वर्षांत ११०.९८ टनांनी वाढून २०२१ मध्ये ४ हजार ५१६.०६ टन झाला आहे.