मुक्तपीठ टीम
राज्यात पावसाचा जोर वाढताच आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे याचा रस्ते वाहतुकीला मोठी फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालेआहे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत.
मुंबई
मुंबईसह महानगरामध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे याचा रस्ते वाहतुकीला मोठी फटका बसला आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत.
पालघर
१२ आणि १४ जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा हवामान खात्याने इशारा देण्यात आला आहे. पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिले आहे. वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली आहे. या दरडीखाली ६ जण अडकले होते. त्यापैकी ४ जणांची सुटका करण्यात आली आहे.
ठाणे
ठाणे शहरात देखील प्रचंड पाऊस कोसळत आहे. वंदना सिनेमा चौकात पाणी साचलेले आहे. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी सध्या कमी आहे. त्यामुळे अजूनही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी
रत्नागिरीमध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसानं जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस होता. पण सध्या मात्र पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. पण असं असलं तरी हवामान विभागांना दिलेला पावसाचा इशारा पाहता नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क आहे. सध्या जिल्ह्यामध्ये NDRF च्या टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत.
पुणे
पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात अति मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना तसेच दुकानदारांना मोठ्या संकटाला सामोरे जाव लागत आहे.गेले तीन दिवस पुण्यात संततधार पाऊस पडल्याने खडकवासला धरण १०० टक्के भरलं.
धरणातील पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलं.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
कोल्हापूर
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ही ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. सध्या पंचगंगा नदीतील पाण्याने ३५ फूट २ इंच इतका स्तर गाठला आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याचा स्तर वाढत असल्याने पंचगंगेच्या किनाऱ्यालगत राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तलावाचा सांडवा फुटल्याने गावात पाणीच पाणी झाले आहे तर अनेक घरांत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. मात्र मोठी जीवितहानी टळली आहे. नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ६ टक्क्यांनी वाढ झालीय.
अहमदनगर
भंडारादरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पावसाचा वेग वाढल्याने भंडारदरा आणि निळवंडे हे दोन्ही धरण निम्मे भरले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक छोटी धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. जिल्ह्याच्या बहुतांश भागात सकाळपासूनच संततधार. गोदावरी नदीच्या पाणी पातळी थोडी घट तर भीमा नदीची पाणी पातळी वाढली.
नागपूर
नागपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारा, नागपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडांसह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
परभणीत
सलग पाच दिवस परभणीत पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे पीक चांगली बहरली असून प्रकल्पातील पाणी साठ्यात ही चांगली वाढ झाली आहे. येलदरीत २.१४ टक्के तर लोअर दुधना प्रकल्पात ७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
वर्धा
वर्धा जिल्ह्यात १४ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वर्ध्यात पवनुर गावाला पुराचा विळखा बसला आहे. गावात गुडघाभर पाणी शिरले आहे. पुराच्या पाण्यात आतापर्यंत कोणतेही जीवितहानी नाही झाली. पवनूर गावातील नागरिकांची प्रशासनाकडून मंदिरात व्यवस्था केली आहे.
यवतमाळ
उमरखेड तालुक्यात मंगळवारपासून पाऊस सुरू आहे. पुसद दहागाव जवळील पुलाच्या बाजूने रस्त्यावर पाणी आल्याने रास्ता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसापासून आर्णी शहरात जोरदार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले. अरूनावती नदी दोन्ही थड्या भरून वाहत आहे. अशातच या नदीच्या प्रवाहाचे पाणी नाल्यात आल्याने नाल्यांना पूर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले आहे.
गोंदिया
गोंदिया जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच गोंदिया तिरोडा राज्यमार्गावरील कच्चा रस्ता जोरदार पावसामुळे वाहून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प पडली आहे. सोबतच पांगोली नदीवर गिरोला ते सिंधीपारटोला या गावादरम्यान बांधण्यात आलेला पूल सुद्धा वाहून गेला आहे.