मुक्तपीठ टीम
सोमवारी २० जून रोजीचा दिवस भाजपा विजयाचा १० जूनसारखा असणार की महाविकास आघाडी एकत्रितपणे लढून विजय मिळवणार, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे होत आहेत. त्यातही राज्यसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या अपक्ष आणि छोट्या पक्षांपैकी एक बविआ आमदार क्षितिज ठाकूर अमेरिकेतून मुंबईत परतले आहेत. ते कुणाच्या सांगण्यावरून परतले त्यावरही विजयाचा काटा कुणाकडे झुकणार ते ठरणार आहे.
खरंतर आकड्यांचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे अगदी राज्यसभा निकालाचा विचार केला तरी भाजपापेक्षा आमदारांचं बळ जास्त आहे. पण राज्यसभेला बळ असूनही पराभव पत्करावा लागलेल्या शिवसेनेच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल नाराजीची भावना असल्याने आतापर्यंत शिवसेनेची भूमिका स्पष्ट नाही. त्यांनी जर आपल्या दोन उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक मते राखत उर्वरित काँग्रेसकडे वळवली तर काम सोपे होणार आहे. तसेच अपक्ष आणि छोटे पक्ष यांना भाजपाचे लाड प्रसाद वाटून पटवतात की काँग्रेसच्या जगतापांची भाईगिरी चालते हेही महत्वाचे ठरणार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ लक्षात घेतले आणि काही वेगळं घडलं नाही तर त्यांचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयाचा मार्ग सहज पार करतील. तसेच भाजपाचे पाच उमेदवार सहज विजयी होतील. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांचे चित्र स्पष्ट आहे. पण दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात जबरदस्त टक्कर होण्याची शक्यता आहे. भाई जगताप यांना विजयासाठी १० अतिरिक्त आमदारांची गरज आहे, तर लाड यांना विजयासाठी २२ अतिरिक्त आमदारांची गरज आहे.
अपक्ष – छोटे पक्ष आणि शिवसेनेचा कोटा…
- भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजय लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या बळावरच होणार आहे.
- ते बळ ज्या उमेदवाराच्या पाठीशी असेल त्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे.
- त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते त्यांना प्रभावित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
- बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांवर बरंच काही अवलंबून आहे.
- तसंच शिवसेनेकडे किमान नऊ अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत.
- त्यांच्या दोन उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक कोटा ते ऐनवेळी जाहीर करणार आहेत. त्यानंतर उरलेली त्यांनी भाई
- जगतापांकडे फिरवली तर ते विजयी होऊ शकतील.