उदयराज वाडिमकर / कोल्हापूर
पावसाचं विघ्न आलं तरी कोल्हापुरात महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना दणक्यात पार पडला. कोल्हापूरकर पृथ्वीराज बाबासाहेब पाटीलने मुंबई पूर्वच्या विशाल बनकरवर विजय मिळवला. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मानाची गदा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराजच्या हाती सोपवली. विजयाचा दणदणाटी उल्हास सुरु असतानाच पृथ्वीराजनं पुढची झेप कशी ते सांगितलं, “मॅटवरील अनुभव आहे. आता आणखी पुढे लढणार. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्ती मारणार!”
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ६४व्या #महाराष्ट्र_केसरी स्पर्धेला उपस्थित राहून विजेत्या पृथ्वीराज पाटील याला मानाची गदा देऊन सन्मानित केले. pic.twitter.com/BDQUQ0ocmN
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2022
कोल्हापूर पंढरी असलेल्या कोल्हापुरातील पृथ्वीराज बाबासाहेब पाटीलनं महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. महाराष्ट्र केसरीच्या गदेवर महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबई पूर्व चा विशाल बनकर याच्यातच अंतिम लढत झाली. त्यामध्ये पृथ्वीराजने विजयाची नोंद केली.
पृथ्वीराज हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचा. त्याने मोतीबाग तालमीत श्रीगणेशा केला. पृथ्वीराज वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले,त्याचे चुलते पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. लहानपणापासून भरपूर दूध आणि चुलत्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला पृथ्वीराजमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात २१ वर्षांनंतर मानाचा तुरा खोवला गेला.