मुक्तपीठ टीम
‘हुरुन इंडिया’ आणि ‘एडेलगिव्ह’ यांनी जाहीर केलेल्या ‘2021 मधील भारतातील आघाडीच्या परोपकारी व्यक्तीं’च्या प्रतिष्ठित यादीत ‘लार्सन अँड टुब्रो’चे अध्यक्ष ए.एम. नाईक यांना ‘भारतातील सर्वात उदार कॉर्पोरेट लीडर’ म्हणून स्थान देण्यात आले आहे.
या सन्मानाबाबत बोलताना श्री. नाईक म्हणाले, “या यादीत झालेल्या माझ्या समावेशातून, मी करीत असलेल्या सामाजिक कामांची दखल घेण्यात आली आहे. आपल्यापेक्षा कमी भाग्यवान असलेल्यांना मदत करण्यासाठी यातून इतरांना प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे. तुम्ही इतरांचा विचार केलात की, तुम्हाला जे आंतरिक समाधान मिळते, ते तुम्ही इतर कशातूनही मिळवू शकत नाही.”
‘हुरुन अहवाल’ हा जगातील सर्वात मोठा ‘श्रीमंतांच्या सूचीचा’ संकलक आहे आणि ‘एडेलगिव्ह फाउंडेशन’ ही एडेलवाईस समुहाची सामाजिक शाखा आहे. वर्षाकाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या देणाऱ्या ११ व्यक्तींचा, तसेच ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या देणाऱ्या २० जणांचा आणि २० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या देणाऱ्या ४२ जणांचा या यादीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या वर्षी, श्री. नाईक यांचा ‘हुरुन यादी’मध्ये समावेश झाला होता आणि सर्वात ‘उल्लेखनीय नवीन प्रवेशिका’ म्हणून त्यांच्या समावेशाचे वर्णन करण्यात आले होते.
श्री. नाईक हे वैयक्तिकरित्या करीत असलेल्या सामाजिक कामांमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य-निर्माण या तीन क्षेत्रांवर भर देण्यात येतो. 2010 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट’ आणि ‘ए. एम. नाईक चॅरिटेबल ट्रस्ट’ या दोन संस्थांच्या माध्यमातून बहुतांश उपक्रम चालवले जातात. श्री. नाईक यांच्या म्हणण्यानुसार, “माझे दोन्ही ट्रस्ट जीवनाशी जोडलेले आहेत. एक जीवाचे रक्षण करतो, दुसरा त्याचे परिवर्तन घडवितो.” यातील प्रत्येक ठिकाणी त्यांनी उभारलेल्या सुविधांमुळे हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडून येत आहेत.
श्री. नाईक यांच्या सामाजिक कामांचे सर्वत्र कौतुक होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये गुजरातमधील नवसारी येथे निराली कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी केली. या वर्षाच्या सुरुवातीला गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या रुग्णालयाचे उद्घाटन केले. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी मार्चमध्ये निराली मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी केली आहे.
ही दोन्ही रुग्णालये, तसेच डॉक्टर व परिचारिकांसाठीची निवास व्यवस्था हा मोठ्या स्वरुपात असलेल्या ‘ए. एम. नाईक हेल्थकेअर कॅम्पस’चा एक भाग आहे. दक्षिण गुजरात व मुंबई येथे श्री. नाईक यांनी बांधलेल्या आरोग्य सेवा सुविधांपैकी ही रुग्णालये सर्वात अलीकडच्या काळातील आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातही श्री. नाईक यांचे काम सुरू आहे. गुजरात राज्यातील खारेल येथे ते एक मोठा कॅम्पस उभारीत आहेत. त्या ठिकाणी प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि विद्यार्थी व शिक्षकांसाठी निवास व्यवस्था असेल. कौशल्य-निर्मितीच्या क्षेत्रात काम करताना श्री. नाईक यांनी खारेल (गुजरात) येथे अनिल नाईक तांत्रिक प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. ज्यांच्याकडे कोणतीही औपचारिक पात्रता नाही, अशा गावांकडील तरुणांना – स्त्री व पुरुष दोघांनाही – नवीन भविष्य प्रदान करण्यात हे केंद्र मदत करीत असते.
पार्श्वभूमी
लार्सन अँड टुब्रो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ईपीसी प्रकल्प, हाय-टेक मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवांमध्ये ती गुंतलेली आहे. जगभरातील 50हून अधिक देशांमध्ये ती कार्यरत आहे. एक मजबूत, ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन आणि उच्च गुणवत्तेच्या शोधात सतत असल्यामुळे, गेल्या आठ दशकांत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व प्राप्त करण्यास आणि ते टिकवून ठेवण्यास एल अँड टी सक्षम ठरली आहे.