मुक्तपीठ टीम
केंद्रीय तपास यंत्रणांनी गुरुवारी केलेल्या छापेमारीत इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) देशभरातील प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. या संघटनेचं नाव देशात घडणाऱ्या हिंसक आणि दहशतवादी कारवायांमध्ये समोर आले आहे. लव्ह-जिहाद, सक्तीचे धर्मांतर, आयएसमध्ये दहशतवादी पाठवणे, अरब देशांकडून निधी गोळा करणे अशा प्रकरणांमध्येही पीएफआयचा संबंध असल्याचे आढळून आले.
लव्ह जिहाद प्रकरणातही पीएफआयचा संबंध
- २०१७ मधील वादग्रस्त हादिया ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाची चौकशी करताना एनआयएने दावा केला की, महिलांच्या इस्लाम धर्मांतरणाच्या दोन प्रकरणांमध्ये मजबूत संबंध आहे.
- त्यावेळी एनआयएने म्हटले की, पीएफआयशी संबंधित चार जणांनी केरळमधील रहिवासी असलेल्या अखिला अशोकन यांचे धर्मांतर करून तिचे नाव हादिया ठेवण्यास भाग पाडले होते.
- एजन्सीने असेही म्हटले की, त्यांनीच अथिरा नांबियारला धर्मांतरासाठी प्रोत्साहित केले.
- केरळ पोलिसांनी सक्तीच्या धर्मांतराच्या ९४ संशयित प्रकरणांची यादी देखील एनआयकडे सादर केली होती, ज्यात केंद्रीय एजन्सीला या प्रकरणांचा तपास करण्यास आणि काही संबंध आहे का ते पाहण्यास सांगितले होते. एनआयएने दावा केला की, यापैकी किमान २३ विवाह पीएफआयने केले होते.
२००७ रोजी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेची स्थापना
- केरळमध्ये ‘नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट’ (एनडीएफ) तामिळनाडूमध्ये ‘मनिथा नीथि पासराई’ आणि ‘कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी’ या संघटनांची स्थापना झाली.
- २२ नोव्हेंबर २००६ रोजी केरळमधील कोझिकोड इथं एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
- त्या बैठकीत या तिन्ही संघटनांचं विलिनीकरण करायचं ठरलं.
- १७ फेब्रुवारी २००७ रोजी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.
- या तिघांपैकी एनडीएफ या कट्टर मुस्लिम संघटनेचा उल्लेख करणे गरजेचे आहे कारण, बाबरी ढाचा पाडल्यानंतर एक वर्षानंतर १९९३ मध्ये याची स्थापन झाली.
- एनडीएफची स्थापना करणाऱ्यांमध्ये स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) चे सदस्य होते, ज्यावर भारत सरकारने बंदी घातली आहे.
पीएफआय संघटनेच्या कारवायांची लांबलचक यादी
- ही संघटना अल्पसंख्यांक समाजावर धार्मिक कट्टरता लादण्याचे आणि त्यांना इतर धर्मियांचे धर्मांतर करण्यास भाग पाडण्याचे काम करते.
- काही लोक बेपत्ता झाल्याचे तसेच सीरिया आणि अफगाणिस्तानात जाऊन दहशतवादी संघटना आयएसमध्ये सामील झाल्याचा आरोप पीएफआयवर होता.
- ईडी आणि आयकर विभागाने पीएफआयचा निधी उभारण्यासाठी होणाऱ्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
- निधी उभारण्यासाठी त्यांचे पदाधिकारी अरब देशांमध्ये जात असल्याची माहिती समोर आली आहे.
- त्यांचे अनेक समर्थक या देशांमध्ये कार्यरत होते.
- यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या रकमेचा तपास सुरू करण्यात आला.