मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलेलं असतानाच शिवसेनेनं प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली आहे. शिवसेनेची बाजू मजबुतीने मांडणाऱ्या दोन नेत्यांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. लोकसभेत अभ्यासूपणा आणि आक्रमकतेच्या बळावर शिवसेनेचा किल्ला लढवणारे खासदार अरविंद सावंत हेही आता सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्याप्रमाणेच मुख्य प्रवक्ते आहेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाने कुणालाही न दुखावता पक्षाची योग्य भूमिका माध्यमांमध्ये मांडली जावी, यासाठी काळजी घेतल्याचे मानले जात आहे.
तसेच अन्य प्रवक्त्यांची निवड करतानाही पक्षासाठी योग्य पद्धतीने बाजू मांडतील अशी नावे निवडली आहेत. तसेच आनंद शुक्लांची निवड करून प्रेम शुक्ला यांच्यानंतर हिंदी भाषिक पत्रकाराची वर्णी लाऊन ती पोकळी भरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, आमदार सुनिल प्रभू यांच्यासारखे अभ्यासून प्रकटणारे नेमतानाच काही आक्रमक चेहरेही समोर आणण्यात आले आहेत. त्याचबरोबर औरंगाबादचे अंबादास दाणवे, नागपूरचे किशोर कन्हेरे, कोकणातील भास्कर जाधव यांच्या नियुक्तीमुळे मुंबईबाहेरील नेत्या-पदाधिकाऱ्यांना माध्यमांमध्ये बोलण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी
मुख्य प्रवक्ते
- संजय राऊत – राज्यसभा खासदार
- अरविंद सावंत – लोकसभा खासदार
प्रवक्ते
- प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
- अॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
- सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन नियुक्ती)
- सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
- प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
- भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन नियुक्ती)
- अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन नियुक्ती)
- मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार
- किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
- शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन नियुक्ती)
- डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन नियुक्ती)
- किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन नियुक्ती)
- संजना घाडी (नवीन नियुक्ती)
- आनंद दुबे (मुंबई) (नवीन नियुक्ती)
जुन्या यादीतील चार नावे नाहीत
- हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.
- नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती असल्याने त्यांचे नाव नसणे स्वाभाविक मानले जाते.