मुक्तपीठ टीम
न्यायालयाच्या ऑनलाईन सुनावणी दरम्यान केलेले विधान एका वकिलाला चांगलेच महागात पडले आहे. कोरोना महामारीत सर्व जगच ऑनलाईन झाले आहे. शिवाय न्यायालयाच्या सुनावण्यादेखील ऑनलाईनच होत आहेत. अशातच मुंबई न्यायालयात होणाऱ्या ऑनलाईन सुनावणी दरम्यान मायक्रोफोन सुरू असल्याची कल्पना नसणाऱ्या वकिलाने “या कोर्टात किती गर्दी आहे”, असे वक्तव्य केले. या विधानामुळे न्यायमुर्ती सारंग कोतवाल यांनी वकिलाला चांगलेच फैलावर घेतले. त्यावेळी न्यायालयात सरकारी वकील, पोलीस अधिकारी आणि इतर सदस्य उपस्थित होते.
घडलं ते बिघडवणारं असं…
न्यायालयात ऑनलाईन सुनावणी होत असताना, एका वकिलाने “या कोर्टात किती गर्दी आहे”, असे विधान केले. न्यायाधिशांनी आपल्या सहकाऱ्याला हे विधान कोणी केले असल्याचा तपास करण्यास सांगितला. मात्र विधान केलेल्या वकिलाने लगेचच लॉगआऊट केले आणि त्यांच्या जागी दुसरे वकिल उपस्थित असल्याचे समोर आले. वकिलाने केलेल्या या विधानानामुळे न्यायाधिशांनी वकिलाला चांगलेच खडे बोल सुनावले.
न्यायाधिशांनी वकिलाला तात्काळ उपस्थित राहण्याचे आदेश दिले. काही काळाने सुनावणीमध्ये वकिल उपस्थित झाले आणि त्यांनी न्यायाधिशांची माफी मागितली. मात्र न्यायाधिशांनी माफी स्वीकारण्यास नकार दिला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल म्हणाले की, ‘माझ्या सुनावणीत कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. कायदेशीर ज्ञानासोबत न्यायालयात कसे, काय बोलायचे हे तुम्हाला शिकणे गरजेचे आहे,’ असे ते म्हणाले.
आपल्या सहकाऱ्यांकडून न्यायालयात कसे वावरायचे, हे शिकणे गरजेचे असल्याचे त्यांनी वकिलाला सांगितले. तुम्ही न्यायालयाचा आदर केला नाही, तर तुम्हालाही आदर मिळणार नाही. अशा शब्दांत न्यायाधीशांनी वकिलांना चांगलेच बोल सुनावले. यावेळी पुन्हा एकदा वकिलांनी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांची माफी मागितली परंतु माफी न स्वीकारता त्यांनी वकिलांना सुनावणीतून बरखास्त केले.