मुक्तपीठ टीम
हे सुरेल सूर. एका रिक्षाचालकाचे. बालाजी यादवराव कांबळे. लातूरला बार्शी रोडवरील राजे शिवाजीनगरमध्ये राहणारा हा तरुण फक्त दहावीपर्यंत शिकू शकला. त्यामुळे त्यांना रिक्षा चालवण्याचा व्यवसायाकडे वळावं लागलं. पण घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबलं तरी निसर्गानं दिलेली चांगल्या गळ्याची देणगी त्यांना नाव मिळवून देणारी ठरली.
बालाजी कांबळे यांनी मुक्तपीठशी बोलताना आपला सुरेला रिक्षा प्रवास मांडला. ते म्हणाले शिक्षण थांबलं. त्यामुळे रिक्षा चालवू लागलो. अनेकदा स्टँडवर कंटाळा आला की गायचो. हळूहळू माझ्या मित्रांनी कौतुक करायला सुरुवात केली. घरी सुरुवातीला आई-वडिल माझी पत्नी पार्वती कौतुक करत असत. पण वाटायचं ते उगाच बोलतात. पण हळूहळू इतरही कौतुक करु लागले. काही प्रवाशी तर माहित असल्यानं फर्माइशही करतात. आता माझ्या दोन लेकी आहेत, श्रेया आणि रिया. त्या दोघींनाही माझं गाणं आवडतं. जिथं तिथं गातो. आवडतं ती माणसं दाद देतात. पण खरं सांगू गाणं मला आवडतं. त्यानं जे समाधान लाभतं त्यानं सारी दगदग विसरायला होतं. लांबचं भाडं मिळण्यातील आनंदापेक्षाही हा आनंद मोठाच!